वितरकांसह विक्रेत्यांची चौकशी होणार
By Admin | Updated: December 25, 2014 00:10 IST2014-12-24T22:25:32+5:302014-12-25T00:10:16+5:30
खत विक्री घोटाळा : कृषी सहसंचालकांना अहवाल देणार : आर. जी. भोसले

वितरकांसह विक्रेत्यांची चौकशी होणार
सांगली : खत घोटाळा प्रकरणातील वस्तुस्थिती समोर यावी आणि यामधील दोषी व्यक्तींची नावे निष्पन्न व्हावीत, यासाठी मुख्य वितरकासह जिल्ह्यातील विक्रेत्यांची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आर. जी. भोसले यांनी दिली. या प्रकरणाने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. चौकशीअंती स्वतंत्रपणे अहवाल तयार करण्यात येणार असून तो कृषी सहसंचालकांकडे सादर केला जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ६,१८७ मेट्रिक टन सुपर फॉस्फेट खताचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु ते खत विक्रेत्यांमार्फत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबईतील एका अधिकृत खत उत्पादक कंपनीने बोगस बिलांद्वारे खताचे कोट्यवधीचे अनुदान लाटल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. त्यामुळे प्रशासनाने संख (ता. जत), वासुंबे, कुमठे, तासगाव व कसबे डिग्रज आदी ठिकाणच्या विक्रेत्यांकडे तपासणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी डी. ए. शिंगे, डी. एम. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी सुरु केली आहे. खताचा कागदोपत्री पुरवठा दाखवून बोगस अनुदान लाटल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील सहा वितरक आणि आठ विके्रत्यांचे दफ्तर ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी प्रशासनाने संंख (ता. जत) येथील वीस टन खताची तपासणी केली असून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची ५० जणांची यादी घेण्यात आली आहे. कसबे डिग्रज येथील तीस पोती खताची, तर वासुंबे येथील ५० पोती खताची तपासणी करण्यात आली. तासगावमधील तीन दुकानांची तपासणी पथकाने चौकशी केली आहे. पुढील दिवसात याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
खत वितरकांमार्फत जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांपर्यंत पोहोचले आहे. तेथून ते शेतकऱ्यांनी नेल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी खत नेले आहे, त्यांच्याकडे खात्री पटविण्याचे काम प्रशासन करणार आहे. याकरिता विक्रेत्यांकडे असणाऱ्या पावत्यांची तपासणी होणार आहे. पावत्यांवर ज्या शेतकऱ्यांची नावे असतील, त्यापैकी काहींकडे जाऊन त्यांचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
खत घोटाळ्याच्या चौकशीची मागणी
खत खरेदीसाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा गैरवापर केल्याप्र्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांना बुधवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले. कृषी विभागाशी संगनमत करून संबंधित खत कंपन्या मालामाल होत आहेत. या सर्वच प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही तांबोळी यांनी दिला आहे.