सराटीत पाझर तलाव अचानक फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:59+5:302021-09-26T04:28:59+5:30
कवठेमहांकाळ / घाटनांद्रे : सराटी (ता. कवठेमहांकाळ) गावच्या पश्चिमेस असलेला पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान ...

सराटीत पाझर तलाव अचानक फुटला
कवठेमहांकाळ / घाटनांद्रे : सराटी (ता. कवठेमहांकाळ) गावच्या पश्चिमेस असलेला पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान घडली.
सराटीच्या पश्चिम बाजूस लोहार तलाव नावाचा पाझर तलाव आहे. सुमारे अर्धा किलोमीटर लांब, अर्धा किलोमीटर रुंद व अंदाजे तीस फूट खोली असलेला हा तलाव पाण्याने भरलेला होता. शनिवारी सकाळी अचानक हा तलाव फुटल्याने त्या तलावाखालील नालाबांधही फुटला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. ही घटना कोगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील राजू पोतदार यांना समजल्यानंतर त्यांनी त्वरित त्या ठिकाणी भेट दिली व तहसीलदार बी. जे. गोरे यांना याबाबत कल्पना दिली. तहसीलदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या.
जलसंधारण विभागाने भेट देऊन पाहणी केली व स्थानिक गावकऱ्यांच्या प्रयत्नाने व जेसीबीच्या साहाय्याने पाण्याचा प्रवाह ओढ्याच्या पात्रात वळवला. दरम्यान, येथील शेतकरी अविनाश बाळासाहेब पवार, प्रवीण महादेव पवार, रमेश पवार, काशिनाथ शिवाजी पवार, जयश्री दिलीप पवार, शंकर पवार यांच्या व परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीच्या व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी येथील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.