मिरज : येथील शासकीय रुग्णालयातील बाळाच्या अपहरण प्रकरणी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय समितीचा चौकशी अहवाल बुधवारी प्रभारी अधिष्ठातांकडे सादर करण्यात आला. रुग्णालयातील बाळाच्या चोरीच्या घटनेस तेथील सुरक्षारक्षक जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.मिरज शासकीय रुग्णालयातून बाळाच्या चोरीप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे डॉ. प्रियांका राठी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीचा अहवाल बुधवारी प्रभारी अधिष्ठातांना सादर करण्यात आला. रुग्णालयातून बाळ चोरून नेण्यास प्रसूती वॉर्डातील व मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक जबाबदार असल्याचा चौकशी समितीने निष्कर्ष काढला आहे. पाच सुरक्षारक्षक व काही परिचारिका यांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव ९ मेपर्यंत सुटीवर असून या अहवालावर कारवाईचा निर्णय डॉ. गुरव घेणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी यांनी सांगितले.मिरज सिव्हिलमधून कोळे ता. सांगोला येथील कविता समाधान आलदर या महिलेचे नवजात बाळ सारा साठे या महिलेने पळवून नेले होते. गांधी चौक पोलिसांनी सारा साठे व नवजात बालकास सावळज ता. तासगाव येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सिव्हिल प्रशासनास सादर करण्यात आला.
डीएनए चाचणीसाठी घेतले नमुनेपोलिसांच्या मागणीनुसार सिव्हिलमध्ये बाळ व मातेच्या डीएनए चाचणीसाठी दोघांचेही नमुने घेण्यात आले. डीएनए चाचणी अहवाल एका आठवड्यात मिळणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करता येईल.
समितीने केल्या या शिफारसीदोषींवर कारवाईसोबत रुग्णालयात सीसीटीव्ही वाढवावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पासची अंमलबजावणी काटेकोर करावी, वॉर्डाबाहेर आवारात कोणीही येऊन झोपू नये, यासाठी तेथे झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेगळ्या रंगाचा पास द्यावा. नवजात बाळाला तपासणीसाठी कोठेही बाहेर पाठवण्यात येऊ नये. एमआरआय, सोनोग्राफी यासारख्या तपासणीसाठी रुग्णालय कर्मचारी सोबत असावा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. या अहवालातील शिफारसीवर कॉलेज कौन्सिल बैठकीत अधिष्ठाता निर्णय घेतील, असेही डॉ. अहंकारी यांनी सांगितले.