मानधन कर्मचारी भरतीत घोटाळा

By Admin | Updated: February 25, 2015 00:03 IST2015-02-24T23:06:14+5:302015-02-25T00:03:09+5:30

पगार थांबविले : आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादमांची चौकशी

Scam employee recruitment scandal | मानधन कर्मचारी भरतीत घोटाळा

मानधन कर्मचारी भरतीत घोटाळा

सांगली : महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या भरतीची मर्यादा चारशेची असताना, ५३ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना गेल्या वर्षभरापासून मानधन देण्यात आलेले आहे. यात महापालिकेचे जवळपास ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने, याप्रकरणी जबाबदार असलेले आरोग्य अधिकारी सुनील आंबोळे, कामगार अधिकारी के. सी. हळिंगळे, स्वच्छता निरीक्षक आणि २७ मुकादमांचे पगार थांबविण्याचे आदेश आयुक्त अजिज कारचे यांनी दिले. याबाबतची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी आज, मंगळवारी पत्रकारांना दिली.
कांबळे म्हणाले की, मंजूर कोट्यानुसार मिरजेसाठी १0५, कुपवाडसाठी १0५ आणि सांगलीतील दोन प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी ९५ असे एकूण चारशे मानधनावरील कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची पाहणी केल्यानंतर ४५३ कर्मचारी कार्यरत असल्याचे लक्षात आले. अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव स्थायी समिती किंवा महासभेत झालेला नाही. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रशासकीय मान्यतेचीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. परस्पर हे कर्मचारी भरण्यात आले असून त्यांच्या पगारावर आजअखेर ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. हा नियुक्तीचा मोठा घोटाळा आहे. याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी नुकताच आयुक्तांना सादर केला आहे.
याप्रकरणी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आणि प्रसंगी त्यांना बडतर्फही करावे, अशी मागणी आपण आयुक्तांकडे केली आहे. तूर्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्व मुकादम, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य अधिकारी आणि कामगार अधिकारी यांचा समावेश आहे. दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारातून झालेल्या नुकसानीची रक्कम वसूल केली जावी, अशीही मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले. यापुर्वी मिरजेमध्ये बोगस भरतीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)

मुकादम हप्ता घेतात
मानधनावरील कर्मचाऱ्यांना पूर्वी तीन हजार रुपये मानधन होते. आता ते पाच हजार रुपये झाले आहे. अशावेळी महापालिकेचे मुकादम या गोरगरीब कामगारांकडून हप्ते घेत असल्याच्या तक्रारी आहेत. या कामगारांचा छळही केला जातो. त्यामुळे हे सर्व प्रकार यापुढील काळात आम्ही बंद करू, असे कांबळे म्हणाले.

Web Title: Scam employee recruitment scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.