सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

By अशोक डोंबाळे | Updated: April 15, 2025 19:32 IST2025-04-15T19:32:04+5:302025-04-15T19:32:49+5:30

कार्यक्षम अधिकारी म्हणून गांधी यांची ओळख

Satyam Gandhi appointed as Sangli Municipal Commissioner | सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची वर्णी

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपूरला बदली झाली होती. या रिक्त जागेवर अनेक प्रभारी अधिकाऱ्यांचा डोळा होता. पण, राज्य शासनाने मंगळवारी थेट आयएएस अधिकारी सत्यम गांधी यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लावली आहे. सध्या ते डहाणू (जि. पालघर) येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून सेवेत होते.

महापालिका आयुक्त गुप्ता यांच्या कारभारावरून अनेक तक्रारी होत्या. घरपट्टी वाढीच्या प्रश्नावरून तर नागरिकांचाही त्यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला होता. गुप्ता यांच्या रिक्त जागेवर प्रभारी आयुक्त पद घेण्यावरून अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख आणि रविकांत अडसूळ यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अखेर सेवाज्येष्ठतेनुसार अडसूळ यांच्याकडे प्रभारी आयुक्त पदाचा कारभार गेला.

या ठिकाणी पदोन्नतीने अनेक अधिकारी येण्यास इच्छुक होते. पण, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राच्या कारभाराला गती देण्यासाठी पदोन्नतीच्या अधिकाऱ्याऐवजी आयएएस अधिकारीच गरजेचे आहे. ही गरज ओळखूनच लोकप्रतिनिधीसह राज्य शासनाने आयएएस अधिकारी सत्यम गांधी यांची महापालिका आयुक्तपदी वर्णी लावली आहे. सत्यम गांधी हे एक प्रतिभावान आणि कुशल आयएएस अधिकारी आहेत.

सत्यम गांधी यांचा परिचय

बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेले सत्यम गांधी हे यूपीएससी परीक्षा २०२० मध्ये देशात दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रत्येक इच्छुकासाठी प्रेरणास्थान बनले. त्यांचे वडील अखिलेश सिंग हे सरकारी कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहेत. त्यांचा एक लहान भाऊ देखील आहे जो सध्या शिक्षण घेत आहे. सत्यमने आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या दयाल सिंग कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए (ऑनर्स) पदवी प्राप्त केली.

Web Title: Satyam Gandhi appointed as Sangli Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.