सांगली : शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी शिक्षक संघाच्यावतीने ‘साष्टांग नमस्कार, विनंती विशेष’ हे अभिनव आंदोलन राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजे शनिवारपासून हाती घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले की, शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी लाभांश देण्याची घोषणा केली होती. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला तरी सत्ताधाऱ्यांना ही घोषणा पूर्ण करता आलेली नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी संचालकांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन हाती घेत आहोत. या आंदोलनात शिक्षक बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासद कर्जावरील व्याजदर एक अंकी करा, कायम ठेव परत करा आणि तातडीने दोन अंकी लाभांश द्या, अशी मागणी पत्राद्वारे केली जाईल.
सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष आहे. कोविडमुळे प्रत्यक्ष सभासद धडक देणार नसले तरी ‘साष्टांग नमस्कार विनंती विशेष’ या अभिनव आंदोलनातून आपला रोष प्रकट करणार असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी सरचिटणीस अविनाश गुरव, संजय पाटील, शिवाजी जाधव, दिलीप शिंदे, महादेव पवार, संजय सागर, तुकाराम कांबळे, नंदकुमार खराडे, जकाप्पा कोकरे, दिलीप पवार, शशिकांत कुलकर्णी, उमेश माने उपस्थित होते.
चौकट
बक्षीस पगार कुणासाठी?
कोरोनामुळे शिक्षक बँकेचे कामकाज गेले वर्षभर ५० टक्के कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. मग यंदाच्या नफ्यातून त्यांना बक्षीस पगारापोटी ६२ लाखांची तरतूद कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी केली, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला.