खरसुंडीत सिद्धनाथाचा सासनकाठी सोहळा सुनासुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:38+5:302021-05-09T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथाची चैत्र यात्रा कोरोनामुळे यंदाही रद्द झाली आहे. प्रशासनाच्या परवानगीनुसार ...

खरसुंडीत सिद्धनाथाचा सासनकाठी सोहळा सुनासुना
लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथाची चैत्र यात्रा कोरोनामुळे यंदाही रद्द झाली आहे. प्रशासनाच्या परवानगीनुसार कोरोना नियमांचे पालन करत मंदिर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात, मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवारी मंदिरात पूजाअर्चा करून पालखी व सासनकाठी सोहळा साजरा केला. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती.
आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी मंदिरास भेट देऊन देवस्थान समितीस गर्दी न करण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पालखी सोहळा पार पडत असताना गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आटपाडीचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता सिद्धनाथ मंदिराची परंपरा जपत पालखी, सासनकाठी, गुलाल-खोबरे उधळण सोहळा साजरा झाल्याने देवस्थान समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
चौकट
दरवर्षी
चैत्र यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असतो. यावेळी संपूर्ण गाव गुलालात न्हाऊन जात असते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ बंद होती. गावामध्ये शुकशुकाट दिसून आला.
यात्रेदरम्यान छोटे-मोठे व्यापारी येत असतात. ते सर्वकाही ठप्प झाले होते.