अध्यापनातील संस्कारवृक्ष : शंकरराव धोंडीराम पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:06+5:302021-02-21T04:49:06+5:30
कामाचा आनंद घेत जगायला आणि हृदयापासून शिकवायला शिकल्यामुळे अध्यापनाचा रस्ता समाधानाच्या दाट छायेतून गेला. अध्यापनाच्या शेवटच्या टप्प्यात आलो, तरी ...

अध्यापनातील संस्कारवृक्ष : शंकरराव धोंडीराम पाटील
कामाचा आनंद घेत जगायला आणि हृदयापासून शिकवायला शिकल्यामुळे अध्यापनाचा रस्ता समाधानाच्या दाट छायेतून गेला. अध्यापनाच्या शेवटच्या टप्प्यात आलो, तरी आजही न थकता काम करण्याची जी ऊर्जा मिळाली आहे, त्याचेही रहस्य या वाटेतच दडले आहे. ३२ वर्षांचा हा प्रवास आणि या प्रवासातील अनुभवांनी मला नेहमी शिकवलं आणि मी त्यातून विद्यार्थ्यांना शिकवत राहिलो.
- शंकरराव धोंडीराम पाटील, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, कसबे वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली
शेतीच्या आधारावर जगण्याची धडपड करणाऱ्या एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या एका मुलाने खडतर वाटा तुडवत शिक्षणाचे द्वार उघडले. शिक्षणातून अध्यापन क्षेत्रात पाऊल टाकण्यापर्यंत आणि सुमारे तीन तप अध्यापनाचे व्रत सांभाळेपर्यंत त्यांनी कधीही आपल्या सेवेतील प्रामाणिकपणा सोडला नाही. त्यामुळेच नव्या पिढीतही संस्काराचे बीजारोपण त्यांना करता आले. संस्कारवृक्ष म्हणून या क्षेत्रातील त्यांची दाट छाया अनेकांच्या जगण्यातील चटके दूर करीत त्यांचा मार्ग सुकर करणारी ठरत आहे.
शंकरराव धोंडीराम पाटील यांचा हा जीवनप्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. बांबवडे (ता. पलूस) येथे सामान्य कुटुंबात १ जून १९६३ मध्ये त्यांचा जन्म झाला. चार भाऊ, एक बहीण अशा पाच भावंडांसह त्यांचे बालपण गावातच गेले. मोठे बंधू हरिदास धोंडीराम पाटील हे एकटेच शिकले होते. अन्य भावंडांनी शिक्षणाला अर्ध्यावरच रामराम करुन शेतीत आई-वडिलांची मदत करण्याचे ठरविले. शंकरराव यांना मात्र शिकायची इच्छा होती. बांबवडेच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले. शाळेत शंकररावांची प्रगती पाहून बंधू हरिदास यांनी त्यांना पाठबळ दिले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना सांगलीत शांतिनिकेतनमध्ये पाठविले. अकरावी ते बी. एस्सी.पर्यंत त्यांनी येथे शिक्षण घेतले. त्यापुढेही शिकण्याची त्यांची भूक होती. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरात बाळासाहेब खराडे महाविद्यालयात त्यांनी बी.एडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सांगलीतील पुतळाबेन शहा महाविद्यालयातून एम. एड. केले. याठिकाणी बी प्लस गुणांकन मिळविणारे दोनच विद्यार्थी होते, त्यात शंकररावांचा समावेश होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यांना इचलकरंजीजवळील कबनूर येथे स्वामी विवेकानंद विद्यालयात नोकरी मिळाली. ही नोकरी नसून सेवा आहे, या विचाराने त्यांनी यात पाऊल टाकले. दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी माणगाव (रुकडी) येथे अडीच वर्षे, सातारा येथे भवानी विद्यामंदिर, कोकणातील चुनाभट्टी (ता. पेण, जि. रायगड), मांजर्डेतील वसंतराव पाटील विद्यामंदिरात ११ वर्षे, तासगावच्या भारती विद्यालयात साडेआठ वर्षे त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर पदोन्नतीने ते न्यू इंग्लिश स्कूल, कसबे वांगी येथे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. साडेबत्तीस वर्षे त्यांची सेवा होऊन आता ते निवृत्तीच्या जवळ आले आहेत. बी.एसस्सी. झाल्यानंतर सुरुवातीला पन्हाळ्याच्या शिक्षण प्रसारक मंडळात त्यांनी अनट्रेन म्हणून अध्यापन केले. त्यावेळी केवळ १ हजार ४२ इतका पगार होता. पगार, पदोन्नती, आर्थिक प्रगती यांचा विचार त्यांनी कधीच केला नाही. खळाळत्या प्रवाहासारखे वाहत राहणे त्यांनी स्वीकारले.
अध्यापनाचा प्रवास सुरू असताना ११ मे १९९३ मध्ये मांजर्डे येथील उज्ज्वला यांच्याशी शंकररावांचे लग्न झाले. प्रथमच मुलगी पाहायला गेल्यानंतर लग्न जमले. योगायोगाने त्यांचाही प्रवास अध्यापनाच्या दिशेने सुरू होता. लग्नानंतर लगेचच निवड मंडळाकडून त्यांची कवलापूर (ता. मिरज) येथे नियुक्तीपत्र आले होते. लग्नानंतर बरीच वर्षे ते दोघे वेगवेगळ्या जिल्ह्यांत नोकरी करीत होते. तरीही विनातक्रार त्यांनी अध्यापन व संसार केला.
तासगावात घर बांधले, तरी आजही संसाराचे दोर गावातील २६ जणांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीशी बांधले गेले आहेत. मोठे भाऊ हरिदास यांच्याकडे सर्व सूत्रे आहेत. गेल्या ११ वर्षांपासून या दाम्पत्याने पगाराच्या पूर्ण रकमेला कधीच हात लावला नाही. लागेल तेवढे पैसे घ्यायचे व सर्व आर्थिक जबाबदारी मोठ्या बंधूंकडे, अशी त्यांची पद्धती आहे. नव्या पिढीतही त्यांचा हा एकत्रितपणा घट्ट मूळ धरून आहे. शंकररावांचा मुलगा सध्या शिवाजी विद्यापीठात एम. एस्सी., तर कन्या बी. ए. एम. एस.चे शिक्षण घेत आहे. घरातील दुसऱ्या पिढीतील सर्व मुले उच्चशिक्षित आहेत. अध्यापन व वाचन हे त्यांचे छंद असून, ३२ वर्षांहून अधिक काळ अध्यापन करून त्यांनी बहुतांशवेळा १०० टक्के निकालाची परंपरा राखली. त्यांचा हा प्रवास अध्यापनातील अनेकांना दिशादर्शक ठरत आहे. झोकून देऊन सेवा, आनंदाने काम केल्यास यशाच्या पायऱ्या आपोआप मिळतात, हा त्यांचा अनुभवही खूप काही शिकवून जातो.