जागतिक कॉमनवेल्थमध्ये आष्ट्याच्या संकेत सरगरला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 16:23 IST2021-12-09T15:59:36+5:302021-12-09T16:23:42+5:30
त्याची ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे आयाेजित कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगसाठी भारतीय संघात निवड झाली होती. वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५५ किलो स्नच प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले.

जागतिक कॉमनवेल्थमध्ये आष्ट्याच्या संकेत सरगरला सुवर्णपदक
आष्टा : आष्टा येथील आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत महादेव सरगर याने जागतिक कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात भारतीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. यानंतर आष्टा महाविद्यालयात फटाक्यांची आतषबाजी करीत शहरात पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
संकेत सरगर हा आष्टा येथील आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये एमएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याची ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे आयाेजित कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगसाठी भारतीय संघात निवड झाली होती. वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५५ किलो स्नच प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले.
त्याच्या या यशाची माहिती मिळताच आष्टा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळकर, प्रा. डॉ. प्रमोद ओलेकर, क्रीडा शिक्षक प्रा. अक्रम मुजावर, प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर म्हणाले, भारतीय वेटलिफ्टिंग संघात संकेत सरगर याची निवड ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. ५५ किलो स्नॅच प्रकारात अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर संकेतने चमत्कार करीत ११३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे. संकेत सरगर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.
जयंत पाटील यांच्याकडून अभिनंदन
संकेत सरगर याने जागतिक कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर कासेगाव शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी त्याचे अभिनंदन केले.