संजयकाका-घोरपडे गटाचे सूर विधानसभेच्या निमित्ताने जमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:10 IST2019-06-11T00:10:15+5:302019-06-11T00:10:49+5:30
खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे.

संजयकाका-घोरपडे गटाचे सूर विधानसभेच्या निमित्ताने जमले
अर्जुन कर्पे।
कवठेमहांकाळ : खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे. त्यामुळे खा. पाटील व घोरपडे यांचे कार्यकर्ते दोस्तीचे नवे गीत गाऊ लागले आहेत.
गेल्या पाच वर्षात खा. पाटील व घोरपडे यांच्यात राजकीय वितुष्ट आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत आ. पृथ्वीराज देशमुख यांनी हा वाद मिटवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात दोघांचे मनोमीलन करून दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घोरपडे यांनी खा. पाटील यांचे जोमाने काम केले. त्यानंतर शनिवारी खा. पाटील व आ. देशमुख यांचा नागरी सत्कार केला व संजयकाका पाटील लवकर मंत्री व्हावेत, ही इच्छाही व्यक्त केली. आता खा. पाटील यांनी पैरा फेडावा यासाठी घोरपडे गट आस लावून बसला आहे.
या कार्यक्रमात खा. पाटील यांनी सांगितले की, काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी माझ्यात व अजितराव यांच्यात बेबनाव निर्माण केला. परंतु पुढच्या काळात आपण अजितराव यांच्या पाठीशी राहून राजकीय पैरा फेडू. काका व सरकार यांचा हा राजकीय याराना परत एकदा जुळल्याचे चित्र आहे. आ. देशमुख, आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे या भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींनी घोरपडे यांचे तोंडभरून कौतुक करीत व आगामी विधानसभा निवडणुकीत घोरपडे यांना पूर्ण ताकद देणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. आता खा. पाटील व घोरपडे यांच्या गटातील पहिल्या फळीतील नेतेमंडळी एकत्र बस-उठ करत असून, दोन्ही गटात जुळलेला राजकीय सूर ‘सुरेल’ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात काका-सरकार यांच्या मनोमीलनाचे वारे वाहू लागले असून, या माध्यमातून विधानसभेसाठी घोरपडे यांनी शड्डू ठोकला आहे.
काकांचे वजन वाढले
संजयकाका पाटील यांच्या विजयाने तालुक्यात त्यांचे राजकीय वजन वाढले असून, कार्यकर्त्यांच्या बेरजेत वाढ झाली आहे. याचा राजकीय फायदा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अजितराव घोरपडे यांना व्हावा, अशी अपेक्षा घोरपडे गटातून व्यक्त होत आहे.