सांगलीवाडीत अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:44+5:302021-07-15T04:19:44+5:30
सांगली : सांगलीवाडी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला. पथकाने थेट जाऊन कारवाई केल्याने बालविवाह थांबविण्यात ...

सांगलीवाडीत अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
सांगली : सांगलीवाडी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे टळला. पथकाने थेट जाऊन कारवाई केल्याने बालविवाह थांबविण्यात आला. चाइल्ड लाइनच्या माध्यमातून जिल्हा बालसंरक्षण कक्षाला हा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सांगलीवाडीतील या अल्पवयीन मुलीचा तासगाव तालुक्यातील तरुणाशी विवाह होणार होता.
चाइल्ड लाइनच्या माध्यमातून माहिती मिळाली की, मुलीच्या घरातच हा विवाह लावण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक पथक घटनास्थळी जाऊन पोलीस व संबंधित यंत्रणांच्या मदतीने होणारा नियोजित बालविवाह थांबविण्यात यश आले.
बालविवाह रोखणाऱ्या पथकामध्ये जिल्हा बालसंरक्षण अधिकारी बाबासाहेब नागरगोजे, बालसंरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, चाइल्ड लाइनचे समन्वयक दादासाहेब खोगरे, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल श्रीमती जाधव यांचा समावेश होता. मुलीचे १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह लावून देणार नाही असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले, तसेच मुलीचे व पालकांचेही समुपदेशन करीत लहान वयात विवाह केल्याने मुलीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचीही माहिती देण्यात आली. जिल्ह्यात कुणीही मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह लावून देण्यात येऊ नये, असे आवाहन नागरगोजे यांनी केले आहे.