सांगलीच्या आमराईत दसऱ्याला घुमणार संगीताची धून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 15:26 IST2018-10-09T15:21:42+5:302018-10-09T15:26:56+5:30
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सांगलीच्या आमराईत दसऱ्याला घुमणार संगीताची धून
सांगली : सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्यावतीने आमराईत औषध फवारणी, साचलेल्या पाण्याचा निचरा, बंद पडलेले वीजदिवे दुरूस्तीसह काही महत्त्वाची कामे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने आमराई उद्यानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, प्रभाग समिती दोनचे सभापती जगन्नाथ ठोकळे, कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे, क्रेडाईचे सहसचिव दीपक सूर्यवंशी उपस्थित होते.
आयुक्त खेबूडकर म्हणाले की, नागरिकांनी आमराईतील सोयी-सुविधा देण्याबाबत म्हणणे मांडले होते. त्यानुसार कामाला सुरूवात केली आहे. सीसीटीव्ही बसविण्याची सूचना आली होती. तसेच हिरवाईत आल्हाददायक वातावरण करण्यासाठी संगीत यंत्रणा बसवण्याचीही मागणी होती.
ही दोन्ही कामे येत्या दसऱ्यापर्यंत पूर्ण करू, अशी ग्वाही महापौरांनी दिली. काही घरांचे सांडपाणी आमराईत येते. त्या पाण्याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. वॉकिंग ट्रॅकवर पावसाचे पाणी साचते. त्यामुळे त्याची उंची वाढण्यात येणार आहे. खराब झालेली बाकडी बदलली जाणार आहेत. पिण्यासाठी स्वच्छ पाणी, पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.