सांगलीच्या बेदाण्याला ‘जी.आय.’ मानांकन

By admin | Published: March 13, 2016 10:54 PM2016-03-13T22:54:03+5:302016-03-14T00:13:42+5:30

सुभाष आर्वे : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणार सन्मान; शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार

Sangli's bedana 'GI' rating | सांगलीच्या बेदाण्याला ‘जी.आय.’ मानांकन

सांगलीच्या बेदाण्याला ‘जी.आय.’ मानांकन

Next


सांगली : केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाअंतर्गत येणाऱ्या जी.आय.आर. (जिओग्राफिकल इंडिकेशन्स् रजिस्ट्री) ने सांगलीच्या बेदाण्याला जी.आय. (भौगोलिक उपदर्शन) मानांकन जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, चांगला भाव आणि अधिकृत ओळख या आघाड्यांवर सांगलीच्या दर्जेदार बेदाण्याला यश मिळाले आहे. द्राक्ष बागायतदार संघाला यासाठीचे मानांकन प्राप्त झाल्याने संघाकडे बेदाणा उत्पादकांना नोंदणी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शिवलिंग संख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देताना सांगितले की, मानांकन मिळविण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पुण्याच्या द ग्रेट मिशन ग्रुप आॅफ कन्सल्टन्सी या सल्लागार संस्थेच्या सहकार्याने मानांकन प्राप्त झाले. १९७२ पासूनचे भौगोलिक आणि शास्त्रीय अहवाल यासाठी सादर करण्यात आले होते. माती, पाणी, हवामान यांच्यामुळे ठराविक भागातील शेतीमालाला गुणवत्ता प्राप्त होत असते. सांगलीचा बेदाणा हा अन्य भागातील बेदाण्यापेक्षा सरस असल्याने त्यासाठी मानांकन मिळावे म्हणून प्रयत्न झाले. अखेर या गोष्टीला यश मिळाले आणि सांगलीच्या दर्जेदार बेदाण्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले झाले. सामान्य उत्पादनांपेक्षा जी.आय. मानांकन प्राप्त उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव दिला जातो. त्याचबरोबर या नावाची, मालाची कोणीही नक्कल करू शकत नाही. सांगलीच्या बेदाण्याला विदेशातूनही मागणी असते. अनेक वैशिष्ट्यांमुळे सांगलीचा बेदाणा ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. याच गुणवत्तेवर आता केंद्र शासनाचे अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे सभासद असणाऱ्या उत्पादकांनी संघाकडे नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित उत्पादकाच्या मालाची तपासणी करून योग्यतेची खातरजमा होणार आहे. त्यानंतरच उत्पादकाला मानांकनाचा उपयोग करता येईल. येत्या १५ ते १७ मार्च या कालावधित नोंदणीसाठी संघाने आवाहन केले आहे. यावेळी संघाचे मानद सचिव चंद्रकांत लांडगे, सल्लागार संस्थेचे गणेश हिंगमिरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)


हळदीचे मानांकन अडकले
सांगलीची हळदही जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. हळदीमुळे ‘टर्मरिक सिटी’ म्हणून सांगलीला ओळख मिळाली आहे. त्यामुळे सांगलीच्या हळदीलाही जी.आय. मानांकन मिळावे, म्हणून प्रयत्न चालू आहेत. मात्र, तांत्रिक गोष्टीत हळदीचे मानांकन रखडले आहे, अशी माहिती सल्लागार संस्थेच्या एका प्रतिनिधीने दिली.


काय आहेत वैशिष्ट्ये...
सांगलीचा बेदाणा रंग, चव, आकार या सर्वच पातळीवर मानांकन मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. देशातील अन्य भागातील बेदाण्यापेक्षा सांगलीच्या बेदाण्याचा दर्जा अधिक चांगला असल्याचे परीक्षणात स्पष्ट झाले आहे.


दर्जा तपासणीसाठी मंडळ स्थापन
नोंदणी होणाऱ्या उत्पादकांचा माल तपासण्यासाठी पाचसदस्यीय परीक्षण मंडळही द्राक्ष बागायतदार संघाने स्थापन केले आहे. या मंडळामार्फत तपासणी करून बेदाणा दर्जेदार असल्याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतरच मानांकनाचे प्रमाणपत्र दिले जाईल. नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्रही भरून घेतले जाणार आहे.

Web Title: Sangli's bedana 'GI' rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.