इंडियन वेटरन्स प्रिमिअर लीग: सांगलीचा अभिजीत कदम ख्रिस गेलबरोबर खेळणार
By घनशाम नवाथे | Updated: February 14, 2024 15:54 IST2024-02-14T15:53:31+5:302024-02-14T15:54:00+5:30
तेलंगणा टायगर्स संघात निवड

इंडियन वेटरन्स प्रिमिअर लीग: सांगलीचा अभिजीत कदम ख्रिस गेलबरोबर खेळणार
सांगली : ‘आयपीएल’ च्या धर्तीवर देशात होणाऱ्या सिनिअर खेळाडूंच्या ‘इंडियन वेटरन्स प्रिमिअर लीग’ या पहिल्या क्रिकेट स्पर्धेत सांगलीच्या अष्टपैलू अभिजीत कदम याची तेलंगणा टायगर्स संघात निवड झाली आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल कर्णधार असलेल्या या संघात अभिजीत आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर फटकेबाजी करणार आहे. सांगलीला पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना वेटरन्स क्रिकेट असोसिएशन सांगलीचे अध्यक्ष उदय शिंदे म्हणाले, अभिजीत हा गेली २० वर्षे जिल्हा व राज्य स्पर्धेत क्रिकेट खेळतोय. आयपीएल प्रमाणे होणाऱ्या पहिल्या ‘आयव्हीपीएल’ क्रिकेट स्पर्धेत अभिजीतची तेलंगणा टायगर्स संघात निवड झाली आहे. पहिली स्पर्धा २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अभिजीत हा गेल याच्याबरोबर वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, मायकेल क्लार्क, हरभजनसिंग, सनथ जयसूर्या आदी दिग्गज खेळाडूंबरोबर खेळणार आहे.
जागतिक स्तरावर फटकेबाजी करण्यासाठी सांगलीचा अभिजीत सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातून अभिजीत व बाबू यादव या दोघांची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारा अभिजीत हा स्मृती मानधनानंतरचा जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे.
ते म्हणाले, वेटरन्स क्रिकेट संघटना नोंदणीकृत आहे. संघटनेच्यावतीने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर बिरजे, सचिव अभिजीत कदम, खजिनदार प्रकाश फाळके, सदस्य विनायक जोशी आदी उपस्थित होते.