सांगलीत पोलिसाचा बंगला फोडला
By Admin | Updated: July 4, 2014 00:53 IST2014-07-04T00:36:25+5:302014-07-04T00:53:53+5:30
दीड लाखांचे दागिने लंपास

सांगलीत पोलिसाचा बंगला फोडला
सांगली : येथील हरिपूर रस्त्यावरील दीपक गायकवाड यांचा बंगला फोडून चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने लंपास केले. गायकवाड हे सांगली पोलीस दलात बॉम्बशोधक पथकात नियुक्तीस आहेत. याबाबत आज रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नातेवाईकाचे लग्न असल्याने गायकवाड दोन दिवसांपूर्वी कुटुंबासह मुंबईला गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळ्यांचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या दागिन्यांची किंमत दीड लाख रुपये आहे.
काल, बुधवारी दुपारी शेजाऱ्यांना गायकवाड यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. शेजाऱ्यांनी गायकवाड यांना संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गायकवाड कुटुंब घरी नसल्याने चोरीला काय गेले आहे याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. आज (गुरुवार) गायकवाड कुटुंब मुंबईहून परतले. त्यावेळी त्यांना पाच तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
सांगलीत खोक्यांचा संघर्ष नव्या वळणावर
वाद चिघळणार : २९ वर्षांच्या करारपत्रास खोकीधारकांचा विरोध; कायमस्वरुपी पुनर्वसनाच्या मागणीवर ठाम
शीतल पाटील ल्ल सांगल
महापालिका हद्दीतील दोन हजारहून अधिक खोकीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, सांगलीतील स्टेशन चौकातील ४०० गाळ्यांच्या वादाला तोंड फुटले आहे. खोकीधारकांनी हे गाळे कायमस्वरुपी ताब्यात देण्याची मागणी लावून धरली आहे, तर महापालिका कायद्यात एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी करारपत्र करता येत नाही. त्यातच सत्ताधारी काँग्रेसने २९ वर्षे कालावधीसाठी करारपत्र करण्याचा ठराव केला आहे. त्यालाही खोकीधारकांचा विरोध आहे. त्यातून सत्ताधारी व खोकीधारकांत संघर्ष निर्माण झाला आहे. गेली सहा वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले खोकीधारकही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बसस्थानकातील उपाहारगृह सहा महिने बंद
एसटीला दोन लाखांचा तोटा : सांगलीतील चालक, वाहक विश्रांतीगृहात अस्वच्छता
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सांगलीच्या मुख्य बसस्थानकातील उपाहारगृह सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यातच चालक व वाहकांच्या विश्रांतीगृहातील स्वच्छता होत नसल्यामुळे तेथे ढेकणांचे साम्राज्य आहे. याचा फटका मात्र दमूनभागून आलेल्या चालक व वाहकांना बसत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांचीगर्दी असते. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठीचे आणि स्थानकाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेले उपाहारगृह गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एसटीला दोन लाखांचा तोटा झाल्याचे अधिकारी सांगतात. याबद्दल एसटीचे अधिकारी म्हणाले की, निविदांमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागविले आहे. येत्या आठवड्यात उत्तर मिळाल्यानंतर उपाहारगृह चालविण्यास देण्याबाबत निर्णय घेऊ.
मार्गदर्शन मागविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सहा महिने घालविले असतील त्यांच्या कामातील तत्परता दिसून येते! उपाहारगृह नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन आलेल्या चालक व वाहकांना जेवणाची बसस्थानकावर कोणतीही व्यवस्था नाही. बसस्थानकाच्या मागील बाजूस विश्रांती कक्ष आहे. पण, त्याची कधीच स्वच्छता केली जात नाही. येथे ढेकूण झाल्यामुळे चालक आणि वाहकांना झोपच लागत नसल्याच्या तक्रारी आहेत. ते पावसाळ्यात गळत असून तेथे पाणी साचून राहते. महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष बनविण्याची तरतूद आहे. मात्र येथे महिलांसाठी विश्रांतीगृहच नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्यामुळे चालक आणि वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (उत्तरार्ध)
दोन वर्षात सतरा पोलीस जाळ्यात!
पोलीस ‘हिट लिस्ट’वर : लाचखोरीचे ग्रहण
सचिन लाड ल्ल सांगली
गेल्या दोन-तीन वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय सेवेतील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू ठेवली आहे. या मोहिमेत पोलीसच ‘हिट लिस्ट’वर असल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या कारवाईतून दिसून येते. सात अधिकाऱ्यांसह १७ पोलीस लाच घेताना जाळ्यात सापडल्याने, पोलीस दलाच्यादृष्टीने ‘लाचखोरी’ हा चिंतेचा विषय बनला आहे. महिन्यातून किमान एक तरी पोलीस सापडत आहे. तरीही लाचखोरीचे ग्रहण सुटेनासे झाले आहे.
यापूर्वी पोलीस शिपाई, हवालदार लाच घेताना सापडण्याचे प्रमाण नगण्य होते. मात्र आता वरिष्ठ अधिकारीही सापडू लागल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेला तडे जाऊ लागले आहेत. ‘चिरीमिरी’साठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नोकरी धोक्यात टाकली जात आहे. महिन्या-दीड महिन्यातून एखादा तरी ‘खाकी’ वर्दीतील सेवक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अलगद सापडत आहे. ते पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना सापडत आहेत. पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नाला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या करामतींमुळे बदनामीचा डाग लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना ‘चिरीमिरी’साठी त्रास देण्याचा उद्योगही काही पोलिसांकडून सुरू आहे. एखाद्या प्रकरणात काहीही संबंध नसताना कोणालाही ताब्यात घेऊन त्याला त्रास दिला जातो. यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांना दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यांनी सावकारी मोडीत काढली. गुन्हेगारी मोडीत काढली. अवैध धंदेही बंद केले. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप मारली. सेनापती खंबीरपणे पाठीशी असतानाही, काही मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीचा आजार जडल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी सापडल्यानंतर पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली होती. कायद्याचे व जनतेचे रक्षकच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू लागल्याने, सर्वसामान्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इस्लामपुरात पं. स.चा अधिकारी निलंबित
चौकशीत अडथळा : ग्रामसमृध्द योजना
इस्लामपूर : वाळवा पंचायत समितीमधील ग्रामपंचायत प्रशासन विभागाकडील अधिकारी संजय माने यांना खात्यांतर्गत चौकशीमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईला गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दुजोरा दिला.
दोन वर्षांपूर्वी तालुक्यात राबवण्यात आलेल्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेत झालेल्या कामाची चौकशी सुरू होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रसारासाठी गावोगावी फलक लावण्याची मोहीम हाती घेतली होती. हे फलक लावण्यासाठी निधी जमा करण्यात आला होता. या घटनेची चौकशी करण्याचे अधिकार सहाय्यक गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्याकडे देण्यात आले होते.
पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतील आक्षेपार्ह कामांची चौकशी करीत असताना त्यामध्ये वरिष्ठ विस्तार अधिकारी संजय माने यांनी अडथळा आणला. त्यामुळे त्यांना निलंबित करून शिराळा येथे पाठवण्यात आल्याचे गटविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी अधिकारी राहुल रोकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
तासगावला पालिकेचे वातावरण तापणार
आबा-काका गट आमने-सामने : नगराध्यक्ष निवडणुकीत रंगत येणार
तासगाव : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर तासगावच्या नगरपालिकेतील वातावरण तापणार आहे. आता या निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे नजरा लागून राहिल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) व खा. संजयकाका पाटील गट आमने-सामने उभे ठाकणार आहेत. त्यातच पुढचे आरक्षण खुल्या गटासाठी असल्याने जोरदार चुरशीचे संकेत मिळत आहेत.
पालिकेच्या निवडणुकीनंतर पालिकेत गृहमंत्री आर. आर. पाटील गटाचे १०, खा. संजयकाका पाटील गटाचे ८ व काँग्रेस १ असे बलाबल होते. संजयकाका गटात दोन अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. सुरुवातीचा एक वर्षाचा नगराध्यक्षपदाचा काळ आर. आर. पाटील गटाकडे होता. त्यावेळी विजयाताई जामदार नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर सध्या संजयकाका पाटील गटाकडे नगराध्यक्षपद आहे. सिंधुताई वैद्य विद्यमान नगराध्यक्षा आहेत. आता यापुढे दीड वर्षाची मुदत आर. आर. पाटील गटाला व नंतरची एक वर्षाची संजयकाका गटाला, असे ठरले होते. परंतु या दोन नेत्यांची ऐक्य एक्स्प्रेस मध्येच रुळावरून घसरल्याने या निवडीही प्रतिष्ठेच्या बनणार आहेत.
गृहमंत्री आर. आर. पाटील व खा. संजय पाटील यांच्यातील एकीकरणात पालिकेची निवडणूक पार पडली होती. त्यामुळे पक्षीय पातळीवर पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागला. निवडणुकीनंतर या दोन नेत्यांतील दुराव्यामुळे तयार झालेले राजकीय वातावरण उद्याच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत महत्त्वाचे आहे. त्यात विधानसभा निवडणूकही तोंडावरच असल्याने याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यमान नगराध्यक्षा सिंधुताई वैद्य यांची मुदत २२ जून रोजीच संपुष्टात आली होती. परंतु मुदतवाढीच्या निर्णयामुळे निवडीचा विषयच मागे पडला होता. परंतु या फेरनिर्णयानंतर आता तो चर्चेत आला आहे. बुधवार, दि. २ रोजी रात्रीपासूनच या निर्णयाबाबतची चर्चा शहरातील कार्यकर्त्यांत सुरू होती. आज (गुरुवारी) दिवसभर हाच विषय चर्चीला जात आहे. (वार्ताहर)
जतमधील टंचाई आराखडा फोल!
शेतकरी चिंतेत : भूगर्भातील पाण्याची पातळी घटली
जयवंत आदाटे ल्ल जत
जानेवारी ते जून २०१४ अखेर या सहा महिन्यांसाठी ३ कोटी ७७ लाख ३६ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला होता. पावसाने ओढ दिल्यामुळे प्रशासनाचा संभाव्य टंचाई कृती आराखडा फोल ठरला आहे. जुलै २०१४ मधील संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात पाऊस झाला नाही किंवा म्हैसाळ कालव्यातून बिरनाळ साठवण तलावात पाणी आले नाही, तर जत शहरासह तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
जत तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६५ मिलिमीटर आहे. परंतु मागील महिन्यात फक्त ६७.२४ मि. मी. इतका अत्यल्प पाऊस येथे झाला आहे. जून महिन्यात सुरुवातीस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परंतु चार-सहा दिवसातच या वातावरणात अचानक बदल होऊन कडक ऊन पडू लागले आहे. येथील नागरिकांना पावसाळ््यातच उन्हाळ््याचे चटके जाणवू लागले आहेत. पाऊस नसल्यामुळे आणि उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे. साठवण तलाव, विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिक टँकरची मागणी करू लागले आहेत. टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून सर्वेक्षण करणे, प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणे या कामात प्रशासनाचा बराच वेळ जाऊ लागला आहे. त्यामुळे जादा कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर येऊ लागला आहे. जत तालुक्यातील जनतेला सतत पाणी टंचाई आणि दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. शेगाव, उमदी व कुंभारी परिसरात अत्यल्प पाऊस झाला आहे, तर जत, डफळापूर, माडग्याळ, संख, मुचंडी या परिसरात तात्पुरता पाऊस झाला आहे. या पावसामुळे तेथील तात्पुरती पाणी टंचाइ कमी झाली आहे. परंतु तलावात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे जमिनीखालील पाण्याच्या पातळीत कोणतीच वाढ झाली नाही.
पाणी टंचाईसंदर्भात ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या गावपातळीवरील अडचणी आणि त्यावर करण्यात येणारी उपाय योजना यासंदर्भात प्रतिवर्षी प्रशासनाकडून पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करून बैठकीत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. २०१४ मधील टंचाई कार्यकाळात एकही टंचाई आढावा बैठक येथे झाली नाही. लोकप्रतिनिधींनी बैठक घेण्यासंदर्भात प्रशासनाला कोणतीही सूचना केली नाही. राजकीय पक्षाचे प्रमुख हवेत आणि कार्यकर्ते व जनता वाऱ्यावर, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे.
पाच्छापूर, उमराणी, सिंदूर, काराजनगी, डफळापूर, सोनलगी, कुडणूर, एकुंडी, बसर्गी, अमृतवाडी, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, वज्रवाड, बनाळी आदी एकोणीस गावे आणि १०१ वाड्या-वस्त्यांवर सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु तांत्रिक कारणामुळे काहीवेळा त्यात प्रशासनाकडून कपात केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
तीळगंगा ओढ्यात अतिक्रमण
पेठ येथील प्रकार : राजू शेट्टींच्या फंडातून उभारले जातेय सभागृह
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
पेठ (ता. वाळवा) येथील प्रसिध्द तीळगंगा ओढ्यात सध्या अतिक्रमणांची रेलचेल सुरू आहे. विशेष म्हणजे खासदार राजू शेट्टी यांच्या फंडातून लाखो रुपये खर्च करून याच ओढ्यात खुले सभागृह बांधण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात या ओढ्याला पूर येतो, पण याचा कसलाही विचार न करता ग्रामपंचायतीने येथे बांधकामास परवानगी दिलीच कशी, असा सवाल ग्रामस्थांतून केला जात आहे.
सध्या पेठ ग्रामपंचायतीवर नानासाहेब महाडिक व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची सत्ता आहे. महाडिक गटाच्या सौ. सुनीता पवार या सरपंच आहेत, तर राष्ट्रवादीचे डॉ. अरुण पवार उपसरपंच आहेत. पेठ जिल्हा परिषद मतदार संघात महाडिक गटाचे सम्राट महाडिक सदस्य आहेत. गावात खासदार शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही गट कार्यरत आहे. शेट्टी यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन वर्षभरापूर्वी झाले आहे. परंतु हे काम निधीअभावी सुरू झाले नव्हते. सध्या पायाखुदाईसाठी खड्डे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खंडेश्वर व माणकेश्वर देवाची यात्रा पेठ येथे भरते. यात्रेवेळी तिळगंगा ओढ्यातून सासनकाठ्या येत असतात. यावेळी भाविकांचीही मोठी गर्दी असते. या ओढ्यात जर अतिक्रमणे वाढत गेली, तर यात्रेवेळी येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. याच ओढ्यात अंगणवाडी इमारतही बांधण्यात आली आहे. मोठ्या स्वरूपात पाऊस पडल्यास पेठ येथील पुलावरही पाणी येते व ओढा पूर्ण भरून वहात असतो. यावेळी ओढ्यातील अतिक्रमणे पाण्याखाली जात असतात. याचा कसलाही विचार न करता ग्रामपंचायतीने सभागृह बांधकामास कशी परवानगी दिली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या सभागृहाच्या बांधकामाबरोबरच शेतकऱ्यांनी ओढा आत दाबल्यामुळे पात्र निमुळते झाले आहे. हे अतिक्रमणही काढण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
डॉक्टरांवर आज बडतर्फीची कारवाई
आंदोलन चिघळणार : चोवीस जण चिंतेत
सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील अस्थायी २४ डॉक्टरांना चोवीस तासांत कामावर हजर न झाल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बुधवारी बजावण्यात आली होती़ त्यापैकी तीन डॉक्टर आज हजर झाले आहेत. परंतु अद्याप रुजू न झालेल्या २१ डॉक्टरांवर शुक्रवारी बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली़
हजर झालेल्यांमध्ये दोन अस्थायी डॉक्टर असून, एक बंधपत्रित डॉक्टर आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास केंद्र आणि राज्य शासनाप्रमाणे निश्चित करावेत़, यासह काही प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील बारा हजार डॉक्टरांनी बेमुदत असहकार आणि सामुदायिक राजीनामा आंदोलन सुरू केले आहे़ महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे़ संपावर गेलेल्या सर्व डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी निवृत्त काही डॉक्टरांनी काम करण्याची तयारी दर्शविली असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)