सांगलीत घुमला ‘बालस्वर’
By Admin | Updated: November 22, 2014 00:03 IST2014-11-21T23:21:26+5:302014-11-22T00:03:07+5:30
विद्यार्थ्यांचा सहभाग : सांगली शिक्षण संस्थेचा उपक्रम

सांगलीत घुमला ‘बालस्वर’
सांगली : ‘आओ हम सब हाथ मिलाये... दिल से दिल तक राह बनाए...’ हे राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणारे स्फूर्तिदायक गीत १४० चिमुकल्यांच्या आवाजात सहा विविध भाषांत ऐकण्याची संधी आज सांगलीकरांना मिळाली. निमित्त होते सांगली शिक्षण संस्था आणि कलांगण यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आलेल्या ‘बालस्वर’ या संगीतमय कार्यक्रमाचे.
येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर आज सायंकाळपासूनच चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त विविधतेतून एकतेचा संदेश देण्याकरिता आज सायंकाळी ‘आओ हम सब...’ या गीताचे संस्थेतील विविध शाळांमधील १४० विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात गायन केले.
यामध्ये कानडी, तेलगू, मराठी, गुजराती, हिंदी आणि कोकणी या भाषांचा समावेश होता. कार्यक्रमाची संकल्पना, संयोजन आणि संगीत वर्षा भावे यांचे होते, तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते. यासोबतच ‘आम्ही उद्याचे...’, ‘जयदेव जयदेव’, ‘स्वातंत्र्यवीरा तुझी आरती’, ‘चला खाऊ पाणीपुरी’ आदी गीतेही विद्यार्थ्यांनी सादर केली. सर्वच गीतांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मालू हायस्कूलचे मुख्याध्यापक दि. रा. देशपांडे यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, ज. भा. लिमये, शिंदगी सर, सांगली नगरवाचनालयाचे संचालक अतुल गिजरे, संजय कोटणीस आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सांगली शिक्षण संस्था आणि कलांगण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ‘बालस्वर’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्र्थिनींनी सात भाषांमधून गीत सादर केले.