सांगलीत वृद्धेचे दागिने लंपास

By Admin | Updated: December 22, 2014 00:17 IST2014-12-22T00:13:45+5:302014-12-22T00:17:49+5:30

धामणी रस्त्यावर घटना

Sangliata elderly jewelry lumpas | सांगलीत वृद्धेचे दागिने लंपास

सांगलीत वृद्धेचे दागिने लंपास

सांगली : येथील मंगळवार बाजारजवळील महात्मा गांधी कॉलनीत राहणाऱ्या पारूबाई कृष्णा आदाटे (वय ७०) या वृद्धेस जुनी ओळख सांगून आमच्या आईने तुम्हाला बोलाविले आहे, अशी बतावणी करून एका चोरट्याने वृद्धेची बोरमाळ व कर्णफुले असे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. धामणी रस्त्यावर काल (शनिवार) दुपारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी आज, रविवार रात्री विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पारुबाई आदाटे कॉलनी परिसरात फिरत होत्या. त्यावेळी संशयित चोरटा (एम-८०) वरून आला. त्याने पारुबाई यांना ‘काय मावशी, मला ओळखलं का नाही’, असे म्हणून जुनी ओळख काढली. यामुळे पारुबाई यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने ‘मावशी माझ्या आईने तुम्हाला भेटण्यासाठी बोलाविले आहे, तुम्ही माझ्या गाडीवरून चला, मी तुम्हाला पुन्हा येथे आणून सोडतो’, असे म्हणून त्याने पारुबार्इंना गाडीवर बसवून नेले.
धामणी रस्त्यावर गेल्यानंतर चोरट्याने दुचाकी थांबविली. ‘मावशी तुमच्या गळ्यातील बोरमाळ, कर्णफुले आहेत, तशीच आमच्या आईला करायची आहेत, जरा हे दागिने काढून मला दाखविता का, असे चोरटा म्हणाला. पारुबाई यांनीही दागिने काढून त्याला दिले. त्यानंतर तो दुचाकीवरून दागिने घेऊन गेला. त्यानंतर पारुबाई बराच वेळ तिथे बसून होत्या. रस्त्यावरील नागरिकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. नागरिकांनीच त्यांना त्यांच्या घरी आणून सोडले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Sangliata elderly jewelry lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.