सांगलीवर होते राजीव गांधी यांचे विशेष प्रेम--चार वेळा भेट
By Admin | Updated: May 20, 2016 23:40 IST2016-05-20T23:21:42+5:302016-05-20T23:40:12+5:30
दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते; दौरा रद्द झाल्याची --स्मृतिदिन विशेषखंतही होती--राजीव गांधी
सांगलीवर होते राजीव गांधी यांचे विशेष प्रेम--चार वेळा भेट
अविनाश कोळी -- सांगली --वसंतदादांच्या माध्यमातून राजीव गांधी यांचे सांगलीशी नाते जुळले. दादा घराण्यातील तीन पिढ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते सर्वपरिचित झाले. याच प्रेमापोटी त्यांनी एकदा-दोनदा नव्हे, तर चारवेळा सांगलीला भेट दिली. याशिवाय एक दौरा रद्द झाल्याची खंतही त्यांच्या मनात दीर्घकाळ राहिली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशाचे नेतृत्व कोण करणार?, हा प्रश्न निर्माण झाला. वसंतदादा त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते. दादांनी दिल्लीत गेल्यानंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली व पंतप्रधान पदाची सूत्रे राजीव गांधी यांना सोपविण्याची सूचना केली. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांना विनंती केली. राष्ट्रपतींनी त्याचदिवशी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.
वसंतदादांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या या प्रेमापोटी राजीव गांधी यांनीही त्यांच्या घराण्यास भरभरून प्रेम दिले. महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचारासाठी राजीव गांधी दौरे करीत होते. त्यावेळी २0 फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांची सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयासमोरील मोकळ्या मैदानावर सभा झाली होती. ही सभा खूप गाजली. सभेला झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून राजीव गांधी भारावून गेले होते.
त्यानंतर सांगलीच्या शिवाजी स्टेडियमवर धनगर समाजाच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते. त्यावेळी शिवाजीराव शेंडगे पालकमंत्री होते. राजीव गांधी यांना घोंगडे भेट देऊन त्यांच्या गळ्यात ढोलही अडकविला होता. या सत्कारानेही ते भारावून गेले होते.
वसंतदादांची प्रकृती ठीक नव्हती, त्यावेळी मुंबईत रुग्णालयामध्ये त्यांची विचारपूस करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी दादांच्या स्नुषा शैलजाभाभी पाटीलही उपस्थित होत्या. रुग्णालयाच्या खोलीत त्यावेळी तिघेच उपस्थित होते. वसंतदादांचे निधन झाल्यानंतर शासकीय ‘प्रोटोकॉल’ डावलून ते सांगलीत उपस्थित झाले होते. दादांच्या पश्चात त्यांनी प्रकाशबापू पाटील यांच्यावरही तितकेच प्रेम केले. प्रकाशबापू आणि त्यांचे नाते नागपुरात अधिक घट्ट झाले. पंतप्रधान होण्यापूर्वीची ही गोष्ट होती. त्यावेळी पक्षाच्या एका कार्यक्रमानिमित्त राजीव गांधी नागपुरात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये थोडा दंगा झाल्यानंतर तातडीने राजीव गांधी प्रकाशबापूंना घेऊन तिथून निघाले. नागपुरात त्यावेळी एकाच खोलीत प्रकाशबापू व ते राहिले होते. त्यानंतर प्रत्येकवेळी प्रकाशबापूंची ते आपुलकीने चौकशी करीत असत.
दादांच्या पश्चात वसंतदादा कारखान्याच्या आवारात दादांचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण करण्याकरिताही राजीव गांधी शरद पवारांसोबत आले होते. कार्यक्रमानंतर ज्यावेळी कारखान्याच्या कार्यस्थळावर ते भोजनासाठी आले, त्यावेळी अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. राजीव गांधी यांना अक्षरश: उचलून वाहनापर्यंत आणण्यात आले होते. त्यावेळी राजीव गांधी यांनी प्रकाशबापूंना पुण्यापर्यंत येण्याची विनंती केली. मात्र बापूंना त्रास होईल म्हणून त्यांनी पुन्हा तो बेत रद्द केला. प्रकाशबापूंचे पुत्र माजी मंत्री प्रतीक पाटील, प्रकाशबापूंच्या पत्नी शैलजाभाभी पाटील, तसेच त्यांच्या मुलीसोबतही त्यांनी अनेकदा वार्तालाप केला होता. या सर्वांसोबत त्यांनी छायाचित्रही काढले होते. कोल्हापुरात एकदा त्यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सभा झाली होती. त्याचदिवशी सायंकाळी सांगलीत सभा होणार होती. मात्र जोरदार पावसाने ही सभा रद्द झाली. प्रकाशबापूंच्या प्रचारासाठी जाता आले नसल्याची खंत त्यांनी त्यानंतर अनेकदा व्यक्त केली होती. अशा अनेक आठवणींच्या माध्यमातून राजीव गांधी सांगलीशी जोडले गेले आहेत.
वंदन इस जनता को करो!
सांगलीत १९८४ च्या सभेत सुरुवातीला विधानसभेचे उमेदवार विठ्ठलदाजी पाटील यांनी राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजीव गांधी यांनी त्यांना रोखले आणि म्हणाले, ‘वंदन मुझे मत करो, करना है तो इस प्यारी जनता को करो.’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.