सांगलीत उपकेंद्राचे भविष्यात विद्यापीठ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:57+5:302021-07-15T04:19:57+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ होणार आहे. ...

सांगलीत उपकेंद्राचे भविष्यात विद्यापीठ होणार
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ होणार आहे. त्यामुळे उपकेंद्रासाठी जागेचा शोध घेताना भविष्यातील विद्यापीठाचा विचार करणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मागणी केलेल्या जागांची पाहणी करून राज्य शासनास अहवाल देणार आहे, अशी महिती शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे ॲर्ड. धैर्यशील पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे (ता. तासगाव), आटपाडी, खानापूर, जत, शिराळा, सांगली, सलगरे (ता. मिरज) येथे व्हावे, अशी येथील लोकप्रतिनिधी आणि महाविद्यालयांची मागणी आहे. या सर्व जागांचा अभ्यास करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यानुसार आम्ही येत्या आठवड्यात सर्व जागांची पहाणी करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये नवीन विभागही सुरू करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील पीक पद्धतीवर संशोधन, हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात सांगली जिल्ह्याचे स्वतंत्र विद्यापीठही होणार आहे. यासाठी मोठ्या जागेची गरज आहे. या ठिकाणी संशोधन करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ देशभरातून येणार आहेत. काही परदेशातूनही येणार आहेत. या शास्त्रज्ञांची चांगली सोय झाली पाहिजे. विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयातील शिक्षकांची सोय होईल, अशा ठिकाणाची निवड करून शासनाकडे अहवाल देणार आहे. या अहवालानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल.