पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न
By अशोक डोंबाळे | Updated: July 6, 2023 19:11 IST2023-07-06T19:09:20+5:302023-07-06T19:11:14+5:30
जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या.

पांडुरंगाची वारी एसटीला पावली!, सांगली विभागाला मिळाले 'इतके' उत्पन्न
सांगली : आषाढी एकादशीदरम्यान जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या. १ लाख ७२ हजार २४९ किलोमीटर बसेस धावल्या असून ६४ लाख ५६६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी ६१ लाख १४०७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा २ लाख ९१ हजार ५८८ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले. वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठूराया पावला आहे.
आषाढी एकादशीसाठी केलेल्या नियोजनातून सांगली विभागाला ६४ लाखावर उत्पन्न मिळाले आहे. ७९ हजार ८३८ वारकऱ्यांची सुखरूप आणि सुरक्षित वारी घडवून आणण्यात सांगली विभागाला यश आले. २५ जून ते ४ जुलैपर्यंत केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील सांगली, शिराळा, इस्लामपूर, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, विटा, पलूस, तासगाव अशा दहाही आगारांतून गाड्या धावल्या. त्यांना वारकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
ना नफा, ना तोटा
वारकऱ्यांच्या माउलीप्रति असलेल्या ओढीतून सांगली विभागाच्या तिजोरीत ६४ लाखावर रुपये जमा झाल्याने ‘विठ्ठल पावला’ असे म्हणावे लागणार आहे. हे उत्पन्न जरी मोठे दिसत असेल तरी ते ‘ना नफा, ना तोटा’ असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.