शिव स्मारकासाठी सांगलीतून माती, जलकलश रवाना
By Admin | Updated: December 22, 2016 23:35 IST2016-12-22T23:35:52+5:302016-12-22T23:35:52+5:30
मुंबईत मिरवणूक : भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवप्रेमींना निमंत्रण

शिव स्मारकासाठी सांगलीतून माती, जलकलश रवाना
सांगली : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिव स्मारकासाठी सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि नद्यांचे जल कलशांमध्ये भरून रवाना झाले. येथील शिवाजी पुतळ्याजवळ या कलशांचे पूजन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
सांगलीत गुरुवारी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातून आलेले माती व जलकलश एकत्र करण्यात आले. जवळपास १२ कलशांमध्ये जल आणि १२ कलशांमध्ये माती घेऊन प्रत्येक तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक आले होते. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे जल नंतर एका कलशात, तर सर्व माती दुसऱ्या कलशात एकत्रित करण्यात आली. हे दोन्ही कलश शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले.
मकरंद देशपांडे या संकल्पनेविषयी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शिवरायांनी पदस्पर्शाने इतिहास घडविला आहे. अशा सर्व ऐतिहासिक स्थळांवरील माती आणि नद्यांचे पाणी मुंबईतील शिव स्मारकाच्या भूमिपूजनासाठी वापरण्यात येणार आहे. हा सोहळा प्रत्येक शिवप्रेमींनी अनुभवायला हवा.
भाजप, शिवप्रतिष्ठान, शिवसेना व अन्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कलश पूजनासाठी उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देत हे दोन्ही कलश सदाभाऊ खोत व संजयकाका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या एका जीपमध्ये कलश ठेवण्यात आले. भगवे ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हे कलश मुंबईला रवाना झाले. मुंबईतील चेंबूर येथे शुक्रवारी, २३ डिसेंबरला सकाळी हे कलश दाखल होतील. तेथून विविध ठिकाणांहून आलेल्या कलशांची एकत्रित मिरवणूक गेट वे आॅफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जातील. २४ डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यात हे कलश पुन्हा एकत्रित केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय, शिवप्रेमी नेते, कार्यकर्ते या सोहळ्यासाठी जाणार आहेत.(प्रतिनिधी)
येथून आले माती, जलकलश...
आटपाडीतून माणगंगा, कडेगावमधील येरळा, पलूस, मिरज, वाळवा येथील कृष्णा आणि वारणा, शिराळ्यातून तोरणा, मोरणा, भोगावती, तीळगंगा, जतमधील बोर अशा नद्यांचे जल कलशांमधून आणले होते. आटपाडी तालुक्यातील बाणूरगड, मिरजेतील भुईकोट किल्ला, वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड, शिराळा तालुक्यातील प्रचितगड, भुईकोट किल्ला, बहाद्दूरवाडी येथील अंबाबाई मंदिर, जत तालुक्यातील प्रतापराव गुजर समाधीस्थळ येथील माती कलशांमधून भरुन आणण्यात आली होती.