सांगली : आवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:53 IST2018-05-18T13:53:22+5:302018-05-18T13:53:22+5:30
आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांगली : आवंढी गावातील जलसंधारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान
सांगली : आवंढी येथे पाणी फौंडेशनच्या वतीने हाती घेतलेले जलसंधारणाचे अभूतपूर्व काम आहे. आवंढी ग्रामस्थांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी केलेली एकजूट राज्याला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शुक्रवारी जत तालुक्यातील आवंढी गावात पाणी फौंडेशनतर्फे केलेल्या जलसंधारणाच्या कामाची केवळ पाहणीच नाही, तर चक्क तेथे श्रमदान करुन ग्रामस्थांशीही संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने गेल्या तीन वषार्पासून जलसंधारणाचे भरीव काम हाती घेतले आहे. मोठ्या धरणांच्या बरोबरीने दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानातून पाण्याचे विज्ञान समजून घेवून काम केल्याने दुष्काळमुक्तीचे समाधान मिळाल्याचे ते म्हणाले.
राज्यात आतापर्यंत जलयुक्त शिवार अभियानातून ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली तर यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करीत आहोत. जलयुक्त शिवार योजनेमध्ये जनतेचा सहभाग घेतल्याने ग्रामस्थांनाही ही कामे आपली वाटू लागली आहेत.
त्यामुळे गावातील पाण्याचा थेंब न थेंब शास्त्रयुक्त पध्दतीने गावाच्या शिवारात अडविला जात आहे. आज राज्यातील सर्व गावांचा धर्म, जात, पार्टी, गट हे सर्व म्हणजे पाणी आहे. सर्वजण पाण्याकरीता काम करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.
पाणी फौंडेशनने जलसंधारणाच्या कामामध्ये घेतलेला पुढाकार आणि तयार केलेले मॉडेल महत्त्वाचे असून ग्रामस्थांना पाण्याचे शास्त्र समजून सांगितले आहे. पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत सहभागी असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जलसंधारणाच्या कामासाठी ग्रामस्थांना येणारी डिझेलची समस्या निश्चितपणे दूर करू. तसेच जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असेही फडणवीस म्हणाले.