सांगली :  ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:59 PM2018-05-31T16:59:57+5:302018-05-31T16:59:57+5:30

ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

Sangli: Rural post employees get accustomed; Movement for ten days | सांगली :  ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन

सांगली :  ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन

Next
ठळक मुद्देग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम; दहा दिवसांपासून आंदोलन सातवा वेतन लागू करण्याची मागणी

सांगली : ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

केंद्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शहरी डाक कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळाला. मात्र ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा लाभ दिलेला नाही.

कमलेश चंद्र समितीने सातव्या वेतन आयोगाबाबतचा जो अहवाल सरकारकडे सादर केला आहे, तो अर्थमंत्रालयामधून मंजूर होऊन मंत्रिमंडळ समितीकडे मंजुरीस पाठविण्यात आला आहे. तरीही गेल्या अडीच वर्षापासून सातवा वेतन आयोग ग्रामीण सेवकांना मिळालेला नाही. तो लवकरात लवकर मिळावा, या मागणीसाठी संयुक्त कृती समितीमार्फत २२ मेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. संप आजअखेर सुरूच आहे.

मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन कायम ठेवून तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे. मोर्चे, निदर्शने, ठिय्या अशाप्रकारची आंदोलने करून त्यांनी पोस्ट प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची दखल घेऊन दोनवेळा शासनाशी चर्चाही करण्यात आली, पण निर्णय अद्याप झालेला नाही.

यापूर्वीही ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांनी तीनवेळा याच प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यावेळी काही दिवसांची मुदत मागून शासनाने आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आता पुन्हा निर्णय घेण्यासाठी मुदतीची मागणी होत असली तरी, ती ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांना मान्य नाही. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन न थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

जिल्ह्यात ६६0 कर्मचारी संपावर

आंदोलनात संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पुजारी, सचिव विठ्ठल पाटील, अध्यक्ष बी. टी. यादव, प्रकाश जाधव, अजिज मुजावर, राजेंद्र देसाई, सुभाष बोडरे, अर्जुन पाटील, मुनीर मकानदार, मोहन मोरे, जयसिंग साळुंखे, दशरथ गुरव, सत्यानंद पवार, सागर दाबाडे, स्मिता खोत, गजानन टिंगरे, साधना भोसले, हसीना मुल्ला या प्रमुख पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील ६६0 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

ग्रामीण व्यवहार ठप्प

ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोस्टाच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. लोकांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा निघण्याची गरज आहे.

Web Title: Sangli: Rural post employees get accustomed; Movement for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.