सांगलीचे कारागृह झाले ‘ओव्हरफ्लो’
By Admin | Updated: August 30, 2015 22:33 IST2015-08-30T22:33:45+5:302015-08-30T22:33:45+5:30
क्षमता ओलांडली : २२0 क्षमता असताना ३५१ कैदी

सांगलीचे कारागृह झाले ‘ओव्हरफ्लो’
सचिन लाड -- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. २२० क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या ३५१ कैदी आहेत. यामध्ये ३४० पुरुष व ११ महिलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सर्वांवर नजर ठेवताना कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, खंडणी, मारामारी, दरोडा, वाटमारी, घरफोडी, जातीवाचक शिवीगाळ, बेकायदा हत्यार बाळगणे, बलात्कार, विनयभंग, अपहरण यासह अनेक गंभीर गुन्ह्यातील कैदी कारागृहात आहेत. शिक्षा लागल्यानंतर या कैद्यांना पुढे कोल्हापुरात कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात हलविले जाते. एखाद्या गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक झाली की, त्याची पोलीस कोठडी घेतली जाते. तपास संपल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) रवानगी होती.
हा आरोपी जामिनासाठी अर्ज करतो. पण न्यायालयाने जामीन फेटाळला तर त्याला कारागृहातच ठेवले जाते. प्रत्येक पंधरा दिवसाला त्याला न्यायालयात उभे करून कारागृहात ठेवण्याची मुदत वाढवून घेतली जाते. २२० कैदी ठेवण्याची क्षमता असलेले हे कारागृह आहे. यामध्ये २१२ पुरुष व आठ महिलांची क्षमता आहे, पण गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कारागृहातील कच्चा कैद्यांची संख्या वाढत गेली.
दररोज दोन-चार कैदी जामिनावर बाहेर येत असले तरी, तेवढेच विविध गुन्ह्यात कारागृहात जात आहेत. त्यामुळे कैद्यांच्या संख्येचा हा आकडा कधी वाढतो, तर कधी स्थिर राहतो. कैद्यांची दिवसेंदिवस वाढत असणारी संख्या, कारागृहाच्या सभोवताली वाढलेली लोकवस्ती पाहिली, तर सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो. ३५१ कैद्यांवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक कैद्यांना दररोज न्यायालयातील सुनावणीला हजर करावे लागते. हे काम पोलिसांचे असले तरी, कर्मचाऱ्यांना या कैद्यांना आतून सुरक्षित आणावे लागते.
खुनाच्या गुन्ह्यात अनेक संशयितांचे खटले न्यायालयीन पटलावर आलेले नाहीत. चार वर्षापूवी झालेल्या खून प्रकरणांची प्रक्रियाही रेंगाळली आहे. त्यामुळे यातील संशयित कारागृहातच अडकले असल्याचे चित्र आहे.
कैद्यांची वाढती संख्या, कारागृहाची सुरक्षितता, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी, यासाठी सांगलीचे कारागृह हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा घेतली जाणार आहे. दीडशे एकर असलेली ही जागा सध्या एमआयडीसीच्या ताब्यात आहे. ती कारागृहासाठी मिळेल, अशी अपेक्षा आहे. यासाठी कारागृहाचे अधीक्षक एम. एस. पवार प्रयत्न करीत आहेत.