सांगली : महापालिका निवडणुकीची राजकीय गणिते बदलणार, मोठ्या प्रभागांबद्दल नगरसेवकांत मतभिन्नता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:42 IST2018-02-19T17:37:25+5:302018-02-19T17:42:16+5:30
सांगली महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग चांगले, तर काहींच्या मते ते अडचणीचे ठरणार आहेत.

सांगली : महापालिका निवडणुकीची राजकीय गणिते बदलणार, मोठ्या प्रभागांबद्दल नगरसेवकांत मतभिन्नता
सांगली : महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग चांगले, तर काहींच्या मते ते अडचणीचे ठरणार आहेत.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी यावेळी चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे सध्याची दोन सदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात येणार आहे. नव्याने नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेत प्रभागाचा विस्तार होणार असून, २२ ते २५ हजार मतदार असतील. त्यामुळे या प्रभाग रचनेबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
गेल्या दोन, अडीच वर्षांपासून निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या अनेक इच्छुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नाराजी आहे. मात्र, विद्यमान नगरसेवकांमध्ये यावरून मतभिन्नता दिसून येते. काहींनी चार सदस्यांच्या प्रभागामुळे प्रचार करणे व निवडणुकीच्या खर्चात कपात करणे शक्य होणार आहे, तर काहींच्या मते मोठ्या प्रभागांमुळे घोडेबाजाराला अधिक चालना मिळेल.
दरवर्षी महापालिकेच्या निवडणुकीतील घोडेबाजार ठरलेला असतो. यावरून उघडपणे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपही करीत असतात. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आकाराचे प्रभाग होणार आहेत. त्यामुळे प्रचाराचे, यशाचे आणि खर्चाचे गणित कसे राहील, याचा कोणालाही अंदाज नाही. तरीही प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे तर्कवितर्क मांडले आहेत.