सचिन ढोलेसमडोळी : पेठ-सांगली रस्त्याच्या कामाचे रहाटगाडगे दोन वर्षांपासून सुरू आहे. एकूण ४१.२५ किलोमीटर रस्त्यापैकी ४० किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ एक किलोमीटरच्या अंतरातील काम रेंगाळले आहे. हा एक किलोमीटरचा रस्ताच वाहनधारकांच्या जिवाची परीक्षा घेणारा ठरत आहे. ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत असल्याने वाहनधारकांच्या यातना सांगायच्या कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा चारपदरी रस्ता होत आहे. अनेक खडतर प्रवासानंतर अखेर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले. मात्र, प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी एका किलोमीटरच्या मरणयातनांनी प्रवासी हैराण झाले आहेत. येथील मिणचे मळ्यापासून एक किलोमीटरच्या अंतरात काम अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. याच टप्प्यात धूळ, दलदल आणि खड्ड्यांनी प्रवास अक्षरशः जीवघेणा बनला आहे. याठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होत असून, यामुळे नागरिक व वाहनधारक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत.
भू-संपादनात अडले कामकसबे डिग्रज येथे प्रस्तावित टोलनाक्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेत झालेल्या विस्कळीतपणामुळे हे काम रखडले आहे. चाळीस किलोमीटरचा प्रवास एक किलोमीटरच्या कसरतीमुळे नकोसा वाटत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत.
वाट वेडीवाकडी, अपघाताची हमीखड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याच्या डाव्या बाजूकडून वाहने उजव्या बाजूपर्यंत सरकत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येते. त्यामुळे खड्डे चुकवतानाच अपघात होत आहेत.
धुळीचे लोट थांबवण्यासाठी पाण्याचा फवारावाहनधारकांना खड्ड्यांसह धुळीमुळे श्वसनाचे विकार जडत आहेत. त्यावर उपाय म्हणून प्राधिकरण व ठेकेदाराने दिवसातून दोनदा पाणी मारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, सोयीने पाण्याचा फवारा मारला जातो.
शेतकऱ्यांनी जाब विचारलाअलीकडेच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना याप्रश्नी जाब विचारला; मात्र ठोस उत्तर मिळाले नाही. प्रांताधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही ही बैठक निष्फळ ठरली.
४१ किलोमीटरसाठी टोल का ?अवघ्या ४१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी टोलनाका आवश्यक आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रस्तावित टोलनाक्याजवळील एक किलोमीटर रस्ता शेतकऱ्यांच्या भूमी संपादनाच्या वादामुळे थांबला आहे. १५, २२ की २४ मीटर रस्ता रुंद करायचा, या गोंधळात हे काम ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांनी या प्रश्नावर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशासनाने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.
सांगली-पेठ मार्गाचे काम म्हणजे विकासाचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या आयुष्याशी केलेला हा खेळ आहे. रस्त्याच्या कामात सुमारे ३६० शेतकऱ्यांची ६०० एकर जमीन बेकायदेशीरपणे घेतली गेली आहे. त्याची भरपाई न देता टोलनाक्याची उभारणी करण्याचा घाट घातला जात आहे. शासनाकडून रस्त्यासाठी निधी मिळाला असतानाही पुन्हा टोल आकारणे म्हणजे दुहेरी अन्याय आहे. - रघुनाथदादा पाटील, नेते, शेतकरी संघटना
कसबे डिग्रज येथे प्रस्तावित टोलनाक्याच्या एक किलोमीटर परिसरातील रुंदीच्या वादामुळे काम ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांनी न्यायासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. दरम्यान, काही जण शेतकऱ्यांवर रस्ता अडवल्याचा खोटा आरोप करून प्रवासी आणि शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. - संतोष गोपुगडे, महामार्गबाधित शेतकरी
रस्त्याची उंची वाढवल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शेती पाण्याखाली जाऊन दोन वर्षांपासून पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे थांबवावे, हीच आमची मागणी आहे. - प्रशांत पाटील, महामार्गबाधित शेतकरी
Web Summary : The Sangli-Peth highway project faces delays due to land acquisition issues near Kasbe Digraj, causing a kilometer-long stretch of hazardous conditions. Commuters endure dust, potholes, and accidents, while farmers protest the proposed toll plaza and disruption to their land.
Web Summary : सांगली-पेठ राजमार्ग परियोजना कसबे डिग्रज के पास भूमि अधिग्रहण के मुद्दों के कारण विलंबित हो रही है, जिससे एक किलोमीटर का खतरनाक क्षेत्र बन गया है। यात्री धूल, गड्ढों और दुर्घटनाओं का सामना कर रहे हैं, जबकि किसान प्रस्तावित टोल प्लाजा और अपनी भूमि में व्यवधान का विरोध कर रहे हैं।