सांगलीत सहा तासांत फक्त तीन इंच पाणी उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:27 IST2021-07-31T04:27:07+5:302021-07-31T04:27:07+5:30
सांगली : जिल्ह्यात पावसाची पुन्हा संततधार सुरू झाल्याने नदीकाठच्या गावात चिंतेचे मळभ निर्माण झाले आहे. शिराळा तालुक्यात शुक्रवारी दुपारपर्यंतच्या ...

सांगलीत सहा तासांत फक्त तीन इंच पाणी उतरले
सांगली : जिल्ह्यात पावसाची पुन्हा संततधार सुरू झाल्याने नदीकाठच्या गावात चिंतेचे मळभ निर्माण झाले आहे. शिराळा तालुक्यात शुक्रवारी दुपारपर्यंतच्या २४ तासांत १२ मिलीमीटर पाऊस झाला. अन्य तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात दुपारनंतर संततधार सुरु राहिली.
कोयना धरणातून सध्या ५० हजार ६१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. चांदोलीमधून १४ हजार ३८९, तर अलमट्टीमधून ४ लाख ८ हजार क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरु आहे. सांगलीत शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी आयर्विन पुलाजवळ ३५.९ फूट होती. दुपारी बारा वाजता ती ३६ फूट होती. सहा तासांत फक्त तीन इंचांनी पाणी कमी झाले.
कोयना धरणात ताशी ५० हजार १८५ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक होत आहे. जवळपास तितका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. धरणांतून विसर्ग वाढण्याची शक्यता जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे. विसर्गामुळे पाणीपातळीत १ ते २ फुटांची वाढ होऊ शकते. आयर्विन पुलाजवळ पातळी ४० ते ४२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठ पुन्हा चिंतेत आहे.
चौकट
चोवीस तासांतील पाऊस असा
मिरज ०.६, जत ०.३, खानापूर-विटा ०.८ वाळवा-इस्लामपूर १.४, तासगाव ०.६, शिराळा १२, आटपाडी ०.२, कवठेमहांकाळ ०.३, पलूस ०.७, कडेगाव ०.८
चौकट
धरणातील पाणीसाठा
वारणा ३१.०१ टीएमसी (९० टक्के), कोयना ८९.०७ (८४.६२ टक्के), अलमट्टी ८६.८५ टीएमसी (७०.६० टक्के).