Sangli Election तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब, मिरजेत प्रभाग चारमध्ये घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:10 IST2018-08-01T16:53:40+5:302018-08-01T17:10:06+5:30
Sangli Election मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

Sangli Election तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब, मिरजेत प्रभाग चारमध्ये घटना
मिरज : मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
बुधवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर औद्योगिक वसाहतीत कामगार असलेला मतदार आयडियल इंग्लिश स्कूल शाळेतील मतदान केंद्रात तीन उमेदवारांना मतदान करून चौथ्या उमेदवारासमोरील बटण न दाबताच मतदान केंद्राबाहेर निघून गेला.
केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी चारवेळा बीपचा आवाज न ऐकताच त्यास बाहेर जाऊ दिले. चार गटात चारवेळा बटण दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने मतदान यंत्र बंद न पडता तसेच सुरू राहिले. ही चूक लक्षात आल्यानंतर मतदान केंद्रातील कर्मचारी व पोलिसांनी संबंधित मतदाराचा शोध घेऊन मतदान केंद्राबाहेरून त्यास पुन्हा मतदान केंद्रात आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर मतदानासाठी मोठी रांग लागली.
या घटनेमुळे रांगेतील मतदारांना काही काळ ताटकळावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या मतदान यंत्राच्या व्यवस्थेसाठी तयारी सुरू झाली. सबंधित मतदाराने मतदान केंद्रात येऊन चौथे मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
मतदान कर्मचाऱ्यांनीही मतदान पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय मतदाराला बाहेर जाऊ दिले. मतदान प्रक्रियेबाबत अपुरी माहिती असल्याने संबंधित मतदाराबाबत हा प्रकार घडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले.