सांगली, मिरजेत रुजतेय प्लेटलेटस्दात्यांची चळवळ...
By Admin | Updated: October 1, 2015 00:39 IST2015-09-30T23:48:52+5:302015-10-01T00:39:50+5:30
प्रबोधनाची मोहीम : प्लाझमाच्या मागणीतही होतेय वाढ, रक्तघटक दान करण्यासाठी युवकांचा पुढाकार

सांगली, मिरजेत रुजतेय प्लेटलेटस्दात्यांची चळवळ...
अविनाश कोळी --सांगली
सांगली, मिरज शहरात रक्तदानाची चळवळ वाढीस लागत असतानाच, आता प्लेटलेटस् (रक्तबिंबिका) दात्यांची चळवळही रुजत आहे. मिरजेतील कर्करोग रुग्णालयातील रक्तपेढीबरोबरच अन्य रक्तपेढ्यांमध्येही स्वेच्छेने प्लेटलेटस् व अन्य रक्तघटक दान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
रक्तातील प्लेटलेटस्, प्लाझमा, आरबीसी (लाल पेशी) क्रायो अशा वेगवेळ्या घटकांची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे अशा विविध रक्तघटकांसाठीही चळवळ उभी राहण्याची गरज होती. प्रबोधनामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी अशा रक्तघटकांसाठी ऐच्छिक दाते मिळणेही तितकेच महत्त्वाचे बनले होते. काही कालावधितच आता रक्तघटकांचे दान करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा दात्यांची वेगळी नोंदही ठेवली जाते.
प्लेटलेटस्, प्लाझमाची मागणी वाढतेय...
मिरजेतील सिद्धिविनायक कर्करोग हॉस्पिटलमधील रक्तपेढीतून दररोज २0 ते २५ पिशव्या प्लेटलेटस्ची मागणी असते. महिन्याकाठी जवळपास ६00 ते ७00 पिशव्यांचा पुरवठा केला जातो. सांगलीतील शिरगावकर रक्तपेढीतूनही महिन्याकाठी जवळपास ९0 पिशव्या प्लेटलेटस्ची मागणी आहे. सांगलीतील अन्य रक्तपेढ्यांचा विचार केला, तर महिन्याकाठी १२00 ते १५00 पिशव्यांची गरज भासते. प्लाझमाची गरजसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. यावरील इंजेक्शन्सचा तुटवडा असल्याने एका पेढीतून जवळपास ५ ते १0 पिशव्या प्लाझमाची मागणी होत आहे. काही महिन्यांमध्ये ही मागणी कमी-जास्त होते.
रक्तदात्यांबरोबरच आता प्लेटलेटस् दात्यांची संख्याही वाढत आहे. गरजेप्रमाणे अशा दात्यांकडून प्लेटलेटस् किंवा अन्य रक्तघटकांची मागणी केली जाते. या चळवळीला चांगले बळ दात्यांमधून मिळत आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना त्याची चांगली मदत मिळत आहे.
- अरुणा साखवळकर,
जनसंपर्क अधिकारी, डॉ. शिरगावकर रक्तपेढी, सांगली
प्लेटलेटस्बाबत जागृती
रक्तपेढ्यांमधून आता प्लेटलेटस् दानाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये प्लेटलेटस् देण्याबाबत सक्षम असलेल्या रक्तदात्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमधील रक्तपेढी व सांगलीतील शिरगावकर रक्तपेढीनेही याबाबत प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. गेल्या चार वर्षात ३0 ते ३५ वेळा प्लेटलेटस् दान करणाऱ्या दात्यांची नोंद रक्तपेढ्यांकडे झाली आहे.
रक्तघटक कशासाठी?
रक्ताचा कर्करोग, डेंग्यू, चिकुनगुन्या तसेच संसर्गजन्य तापाचे अन्य प्रकार यामध्ये रुग्णाला प्लेटलेटस्ची गरज असते. अशा रुग्णांना त्यांच्याच रक्तगटातील दात्याच्या प्लेटलेटस् देण्यात येतात. मूत्रपिंडाचे आजार, अतिरक्तस्त्राव, सर्पदंश झालेल्या रुग्णांना प्लाझमा, आरबीसी अशा रक्तघटकांची गरज लागते.
सक्षक्त होतेय चळवळ
सांगली, मिरजेतील विविध रक्तपेढ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार एकूण रक्तदानापैकी ७० ते ८० टक्के ऐच्छिक रक्तदाते असतात. काहींनी रिप्लेसमेंट म्हणून रक्तदान केलेले असते. ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे.
रक्तघटकांची मागणी वाढत आहे. प्लेटलेटस् दातेही त्याप्रमाणात वाढायला हवेत. आम्ही गेल्या काही वर्षांपासून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अशा दात्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्वच ठिकाणी होत असलेल्या प्रबोधनातून चळवळ सक्षम होत आहे.
- रवींद्र पत्की, जनसंपर्क अधिकारी, सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालय रक्तपेढी, मिरज