सांगली-कुपवाडला दूषित पाणी
By Admin | Updated: April 24, 2015 01:16 IST2015-04-24T01:14:32+5:302015-04-24T01:16:18+5:30
महापौरांकडून खरडपट्टी : स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

सांगली-कुपवाडला दूषित पाणी
सांगली : सांगली, कुपवाड शहराला गेल्या आठ दिवसांपासून दूषित, हिरव्यागार पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल गुरुवारी महापौर विवेक कांबळे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. आठ दिवसांत पाण्यात सुधारणा न झाल्यास अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यात स्थायी समिती सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. कृष्णा नदीतील हिरव्यागार पाण्याला नदीकाठची गावे, शहरे व कारखानेच कारणीभूत असून, या गावांतून दूषित पाणी मिसळते का, याची प्रदूषण मंडळाने तपासणी करावी, असे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उन्हाचा तडाखा वाढला असतानाच नदीपात्रातील पाण्याचा रंगही बदलला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहराला हिरवट व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी दुपारी पाणीपुरवठा विभागाला भेट देऊन दूषित पाण्याबाबत तक्रार केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, केळकर यांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. सायंकाळी महापौर विवेक कांबळे यांनीही माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली.
कांबळे म्हणाले की, शहरातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या जलशुद्धीकरण केंद्रातील एका प्लँटची वाळू बदलण्याचे काम झाले आहे. उर्वरित दोन प्लँटमध्ये हिरवट पाणी दिसत आहे. शेवाळही पसरले आहे. वाळू बदलण्याचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. उन्हाळा सुरू असून, शहरात रोगराई पसरू नये, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. रोगराई पसरल्यास अधिकारी, ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. (प्रतिनिधी)