सांगलीत तलवारीने भटक्या कुत्र्याला ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:18+5:302021-05-03T04:20:18+5:30
सांगली : शहरातील चिन्मय पार्क रोडवर एकाने कुत्रे त्रास देत असल्याच्या कारणावरून तलवारीने भटक्या कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार ...

सांगलीत तलवारीने भटक्या कुत्र्याला ठार मारले
सांगली : शहरातील चिन्मय पार्क रोडवर एकाने कुत्रे त्रास देत असल्याच्या कारणावरून तलवारीने भटक्या कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नियाज बशीर फकीर (रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
भटके कुत्रे त्रास देत असल्याने हे कृत्य केल्याचे संशयिताने पाेलिसांना सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण शहरात पोलिसांकडून कडक पेट्रोलिंग सुरू आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहन बाबासाहेब माळी व त्यांचे सहकारी झेंडा चौक ते चिन्मय पार्क रोडवर गस्तीवर असताना, सोनार मळ्याजवळ त्यांना रस्त्यावर गर्दी दिसली. पोलीस घटनास्थळी जाऊन थांबल्यानंतर संशयिताने हातातील तलवार खाली टाकून दिली, तर त्याच्या समोर भटका कुत्रा मृतावस्थेत पडला होता. यावेळी संशयिताने भटके कुत्रे खूपच त्रास देत असल्याने तलवारीने त्यास मारल्याचे सांगितले. कुत्र्याच्या मांडीवर तलवारीचा वार बसल्याने गंभीर जखमी झालेला कुत्रा मृतावस्थेत होता.
भटक्या कुत्र्यांचे शहरात प्रमाण वाढले असले तरी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी मोहन माळी यांनी संशयित नियाज फकीर याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.