कोरोना लसीकरणात सांगली जिल्हा ३० व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:31+5:302021-02-05T07:32:31+5:30
सांगली : कोरोना गेला, आता लस कशासाठी, ही मानसिकता लसीकरणाच्या गतीवर परिणाम करणारी ठरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा ...

कोरोना लसीकरणात सांगली जिल्हा ३० व्या क्रमांकावर
सांगली : कोरोना गेला, आता लस कशासाठी, ही मानसिकता लसीकरणाच्या गतीवर परिणाम करणारी ठरत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी आहे. राज्यभराची आकडेवारी पाहता सांगली जिल्हा तिसाव्या क्रमांकावर आहे.
लसीकरणासाठी नावे नोंदवून घेतानाच आरोग्य यंत्रणेला पुरता घाम फुटला होता. विशेषत: महापालिका क्षेत्रात नोंदणी अत्यंत कमी झाली. नोंदणीनंतरचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष लसीकरणाचा होता. त्यात मंदावलेल्या पोर्टलचे विघ्न आले. एकेका लाभार्थीची लसीकरण प्रक्रिया पूर्ण करायला अर्धा ते एक तास लागायचा. आरोग्य यंत्रणेने पहाटे दीड-दोनपर्यंत संगणकापुढे ठाण मांडून प्रक्रिया पूर्ण केली, त्यामुळे लाभार्थ्यांना अगदी ऐनवेळी लसीकरणासाठी निरोप मिळाले. या सर्वांचा प्रतिकूल परिणाम टक्केवारीवर झाला. आजवर २६ हजार ४९२ जणांची नोंदणी झाली आहे, प्रत्यक्षात लसीकरण मात्र ७०२४ जणांचेच झाले आहे. २१ केंद्रांवर लस टोचली जात आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज शंभर जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे, मात्र ते पूर्ण होत नाही. आरोग्य कर्मचारीच मागे राहिले तर सामान्यांनी कसे धाडस करावे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
चौकट
कुठे किती लसीकरण
जिल्ह्यात २१ केंद्रे आहेत. तेथील लसीकरण असे : सांगली सिव्हिल ५८३, मिरज सिव्हिल ४६७, भारती रुग्णालय, मिरज - ५२९, वॉनलेस रुग्णालय, मिरज ३६९, हनुमाननगर शहरी आरोग्य केंद्र, सांगली ६९७, जामवाडी आरोग्य केंद्र, सांगली २६३, साखर कारखाना आरोग्य केंद्र, सांगली २२६, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय २४०, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय ४७०, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र १८६, पलूस ग्रामीण रुग्णालय ११५, कोकरुड प्राथमिक आरोग्य केंद्र ३५९, जत ग्रामीण रुग्णालय ५५१, तासगाव ग्रामीण रुग्णालय २३७, कडेगाव ग्रामीण रुग्णालय २९७, आष्टा ग्रामीण रुग्णालय २४२, आटपाडी ग्रामीण रुग्णालय २४५, विटा ग्रामीण रुग्णालय ३२९, खंडेराजुरी आरोग्य केंद्र २३२, नेर्ले आरोग्य केंद्र ३०८, शिराळा उपजिल्हा रुग्णालय ७९.
चौकट
जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ३१ हजार ८०० डोस मिळाले आहेत. पहिल्या पंधरवड्यात लसीकरण अत्यंत मंद गतीने झाले. पोर्टल गतीने काम करत नसल्याने अडथळे आले. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसादही नव्हता. एकूण २६ हजार ४९२ कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. गुरुवारपर्यंत ७०२४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. अद्याप २४ हजार ७७६ डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लसीच्या दुसऱ्या साठ्याची गरज नाही, तो मिळण्याची शक्यताही तूर्त नाही.
लसीचा साठा २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या लस भांडारातच ती पोलीस बंदोबस्तात ठेवली आहे. मागणीनुसार इतर शहरी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांना पाठविली जाते. साठा काळजीपूर्वक हाताळला जात असल्याने एकही डोस वाया गेला नसल्याचा दावा प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी केला.
एका कुपीमध्ये दहा डोस आहेत. प्रत्येक सिरिंजमध्ये लस भरण्यात कमीजास्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्पादक कंपनीने कुपीमध्ये दहाऐवजी साडेदहा ते अकरा डोस भरले आहेत. त्यामुळेही डोस वाया जाण्याचा प्रकार घडला नाही.
चौकट
महिला आरोग्य कर्मचारी सरसावल्या
विशेष बाब म्हणजे लसीकरणामध्ये महिला डॉक्टर्स व कर्मचारी पुढे आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांनी लस टोचून घेतली आहे. जास्त वयोमर्यादा, मधुमेह किंवा अन्य विकार, ॲलर्जी अशा काही कारणांनी काही महिला कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, उर्वरित महिला कर्मचारी मात्र अग्रेसर आहेत.
पाच जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली पिछाडीवर
सांगली ६२.२०, सातारा ९३.९, कोल्हापूर ६२.६०, रत्नागिरी ५५.८०, सिंधुदुर्ग ६८.
-----------
कोट
लस टोचण्यासाठी खासगी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद चांगला नाही. कॉल मिळूनही ते येत नाहीत. त्यांना नव्याने दोनवेळा कॉल देणार आहोत. त्यानंतरही ते आले नाहीत तर त्याविषयी शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. सध्या पोर्टल मंदावण्याची समस्या कमी झाली आहे.
-- डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी
------------- --------