From Sangli district, 499 tonnes of pomegranate, grapes left for Europe | सांगली जिल्ह्यातून १९५ टन डाळिंब, द्राक्षे युरोपला रवाना
निर्यातक्षम डाळिंब निर्यात करण्यापूर्वी त्याची विविध पातळीवर गुणवत्ता तपासणी केली जाते.

ठळक मुद्देउत्पादन घटल्यामुळे तेजी । प्रतिकिलो द्राक्षाला ८० ते ११० रुपये, तर डाळिंबाला १०० रुपये दर

सांगली : दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे निर्यातक्षम द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे ४० टक्केपर्यंत उत्पादन घटले आहे. जिल्ह्यातून पाच कंटेनर डाळिंबे, तर आठ कंटेनरमधून द्राक्षे, अशी १९५ टन द्राक्षे व डाळिंबे युरोपीय राष्ट्रांत रवाना केली होती. प्रतिकिलो द्राक्षाला ८० ते ११० रुपये आणि डाळिंबाला १०० रुपये दर मिळाला आहे. येत्या आठवड्यात दरात युरोपमध्ये आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यांसह मिरज पूर्व भागामध्ये जून २०१९ पर्यंत दुष्काळच पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठी शंभरहून अधिक टँकर सुरु होते. डाळिंब बागा टँकरने जगविल्या. खानापूर तालुक्यातील हिवरे, पळशी, करंजे, बेणापूर, खानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी टँकरने द्राक्षबागा जगविल्या. आॅगस्ट २०१९ पासून सलग चार महिने मुसळधार पाऊस कोसळला.

ओढे-नाले ओसंडून वाहत होते. द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये पाणीच पाणी साचून राहिल्यामुळे दावण्या रोगाचा फैलाव झाला. द्राक्षघडांची गळ झाली. डाळिंबावर ठिपके पडल्यामुळे ते निर्यातीसाठी पाठविताही येत नाहीत. काही शेतकऱ्यांनी मात्र या नैसर्गिक संकटावर मात करुन हिमतीने द्राक्ष, डाळिंब बागा जगविल्या आहेत. हे जरी खरे असले तरी, जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षबागांचे उत्पादन ४० टक्केपर्यंत घटले आहे.

निर्यातक्षम द्राक्षे, डाळिंबांना युरोपीय राष्ट्रात चांगला दर मिळत असल्याचे दिसत आहे. द्राक्ष, डाळिंब बागांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. आम्ही युरोपीय राष्ट्रात पाच कंटेनरमधून ८० टन डाळिंबे निर्यात केली आहेत. भगव्या डाळिंबास सर्वाधिक पसंती असून प्रति किलो १०० रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती निर्यातदार विशाल जोशी यांनी दिली.

मिरजेतील फळांचे निर्यातदार नासीर बागवान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, युरोपमध्ये द्राक्षे, डाळिंबाला चांगली मागणी आहे. पण, तेवढा माल उपलब्ध नाही. आम्ही आठ कंटेनरमधून ११५ टन डाळिंबे व द्राक्षे निर्यात केली. हिरव्या द्राक्षांना प्रति किलो ७५ ते ८५ आणि काळ्या द्राक्षांना ९० ते ११० रुपये दर मिळत आहे. डाळिंबाचा दर्जा पाहून दर आहेत. मध्यम दर्जाच्या भगव्या डाळिंबाला प्रतिकिलो ६५ ते ७५ रुपये आणि चांगल्या दर्जाच्या डाळिंबाला प्रतिकिलो १०० रुपयापर्यंत दर मिळत आहे.

ख्रिसमसमुळे आणखी काही दिवस दर चढेच..
या भागातील मालाची निर्यात डिसेंबरपासून चालू होऊन मार्चपर्यंत चालते. उन्हाळ्यात उत्पादनावर परिणाम होऊन मागणी घटते. यामुळे उर्वरित उत्पादन लोकल मार्केटला कमी दरात विकावा लागते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाळिंबाचे वजन किमान २०० ग्रॅमच्या पुढे असायला हवे. यामुळे असा माल मर्यादित काळातच आपल्याकडे निघतो. या मालाला यावर्षी सुरूवातीच्या पंधरवड्यात ११० रुपये किलोला भाव मिळाला. मात्र यानंतर भावात घसरण होत गेली असली तरी, ख्रिसमसमुळे डिसेंबरमध्ये डाळिंबाचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत राहातील, असा दावा फळे निर्यातदार व्यापाऱ्यांनी केला आहे.


 

Web Title: From Sangli district, 499 tonnes of pomegranate, grapes left for Europe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.