सांगली : रुग्णावर औषधोपचारात हयगय करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जत येथील डॉक्टर डॉ. विद्याधर पाटील यांना ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दंड ठोठावला. त्यांच्याविरोधात शीतल सागर साळे या महिलेने ॲड. शैलेंद्र केळकर यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दिली होती.शीतल साळे यांची चार वर्षांची मुलगी अवंतिका हिला जतमधील डॉ. विद्याधर पाटील यांच्या बालगोपाल लहान मुलांच्या रुग्णालयात २५ जुलै २०१८ रोजी ताप आल्याने दाखल केले होते. तिच्या रक्ताच्या डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, हिमोग्लोबीन, वायडल, आदी चाचण्या केल्या. अवंतिकाच्या प्लेटलेट्स एक लाख ५८ हजार इतक्या असल्याचे दिसून आले.दोन दिवसानंतरही अवंतिकाचा ताप कमी झाला नसल्याने डॉक्टरांनी तिच्या चाचण्या पुन्हा करून घेतल्या. त्यावेळी प्लेटलेट्स ८० हजारांपर्यंत खालावल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी प्लेटलेट्स कमी झाल्याचे कारण शोधण्यासाठी कोणतीही चाचणी न करताच ‘व्हायरल इन्फेक्शन’ गृहीत धरून उपचार केले.
२७ जुलैच्या रात्री अवंतिकाचे पाय गार पडत असल्याचे लक्षात आल्यावर साळे यांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉ. पाटील यांनी अवंतिकावर योग्य उपचार सुरू असून, काळजी करू नका असे सांगितले. २८ रोजी हृदयाचे ठोके तपासले असता ते ५० असल्याचे त्यांनी सांगितले. तिला कार्डियाक मसाज देत सांगलीला जाण्यास सांगितले. सांगलीला नेताना डॉक्टरांनी जीव वाचविणारे कोणतेही उपचार दिले नाहीत. तिची प्रकृती आणखी बिघडल्याने कवठेमहांकाळमध्ये किलबिल रुग्णालयात दाखविले असता डॉ. कोळेकर यांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तसा दाखलाही दिला.साळे यांनी डॉ. विद्याधर पाटील यांच्याविरोधात ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. डॉ. पाटील यांनी सर्व आरोप नाकारले. फेरतपासणीमध्ये मात्र अवंतिकाच्या चाचण्या न करताच तिच्यावर औषधोपचार केल्याचे मान्य केले. आयोगाने डॉ. पाटील यांच्याबाबतची तक्रार शाबीत झाल्याचा निष्कर्ष काढला. साळे यांना नुकसानभरपाई म्हणून ७ लाख ५० हजार रुपये देण्याचे आदेश दिले. शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक लाख, तक्रार अर्जाच्या खर्चापोटी २० हजार देण्याचे आदेश दिले.