सांगली : जिल्ह्यात ५१३ गुंडांना अटक
By Admin | Updated: September 23, 2014 00:11 IST2014-09-22T23:13:11+5:302014-09-23T00:11:03+5:30
विधानसभा निवडणूक : ५३ गुन्हेगारांवर करडी नजर

सांगली : जिल्ह्यात ५१३ गुंडांना अटक
सांगली : विधानसभा निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत रेकॉर्डवरील ५३१ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे. निवडणूक काळात त्रासदायक ठरणाऱ्या ५३ गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर ‘करडी’ नजर ठेवण्यात आली आहे. चार दिवसातून एकदा त्यांच्याकडे तपासणी केली जाणार आहे.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याअनुषंगाने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. बेकायदा हत्यार बाळगणे, दोनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेले व यापूर्वी निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या अशा गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीवर सुमारे दोन हजार गुन्हेगार आहेत. यातील ५३१ गुन्हेगारांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित गुन्हेगारांवरील कारवाई येत्या पंधरा दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
जिल्ह्यात ३४ ठिकाणी ८१ हजारांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. राजकीय मजकूर लिहिलेली ३५ वाहने जप्त केली आहेत. १९८ अजामिनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत. अडीच हजार परवाने असलेले शस्त्रधारक आहेत. यातील ७७३ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. उर्वरित शस्त्रे आठवड्यात जमा करून घेतली जाणार आहेत. ढाबे, हॉटेल, दारूची दुकाने यांना रात्री अकरानंतर व्यवसाय करू नये, अशी नोटीस बजावली आहे. ५२ गुन्हेगार त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्यावर कारवाई झाली असली, तरी त्यांना आठवड्यातून एकदा तरी तपासावे, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांची कुठे उठ-बस असते, यावर नजर ठेवण्याचे आदेश सावंत यांनी दिले आहेत.
गत लोकसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या मारामारीत गुन्हा दाखल झालेल्या ४४५ संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीतही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्याविरुद्धही कडक कारवाई करण्याचा आदेश सावंत यांनी दिला आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याकडून कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)
पेट्रोल पंपांना नोटिसा
जिल्ह्यातील ९७ पेट्रोल पंपचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणुकीचा माहोल असल्याने उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना वाहनात पेट्रोल भरण्यासाठी एखाद्या पंपाची चिठ्ठी दिली जाण्याची शक्यता आहे. चिठ्ठी पाहून कुणाच्या वाहनात पेट्रोल भरू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे.