सांगली : यु ट्युब पाहून बारा वर्षीय मुलाने साकारला आठ फुटी रायगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:32 IST2018-11-06T12:25:17+5:302018-11-06T12:32:26+5:30
दररोज युट्युबवर व्हिडिओ पाहून सांगलीच्या बारा वर्षीय मुलाने आठ फुटी किल्ले रायगड साकारला आहे. अनेक बारकावे टिपत बनविलेला हा किल्ला आता लक्षवेधी ठरला आहे.

सांगली : यु ट्युब पाहून बारा वर्षीय मुलाने साकारला आठ फुटी रायगड
सांगली : दररोज युट्युबवर व्हिडिओ पाहून सांगलीच्या बारा वर्षीय मुलाने आठ फुटी किल्ले रायगड साकारला आहे. अनेक बारकावे टिपत बनविलेला हा किल्ला आता लक्षवेधी ठरला आहे.
सांगलीच्या शिवोदयनगरमध्ये राहणाऱ्या दर्शन सुरेश बंडगर या सातवीतील विद्यार्थ्याने बारा दिवस मेहनत घेत रायगड साकारला. डोंगर उभारताना त्याचा आकार, त्याचा कोन, उंची, लांबी या सर्व गोष्टींचे त्याने बारकाईने निरीक्षण केले. महादरवाजा, खुबलढा बुरुज, चोरदिंडी, हत्ती तलाव, बाजार, मंदिर, टकमक टोक, हिरकणी टोक अशा अनेक गोष्टींचा समावेश त्याने यात केला आहे.
विशेष म्हणजे रायगडावरील वनसंपदा हुबेहुब दिसावी म्हणून त्याने सर्वाधिक मेहनत घेतली. काहीठिकाणी झाडांची उंची कमी काहीठिकाणी जास्त राहील, याची दक्षता घेतली. रायगडाच्या तुलनेत सैन्यदल, राहुट्या, पायऱ्यां यांची उंची व आकारही त्याने निश्चित केला. त्यामुळे अत्यंत देखणा रायगड त्याने साकारला. युट्युबच्या या आधुनिक तंत्राचा वापर करीत त्याने किल्ला साकारल्याने तो अत्यंत लक्षवेधी ठरला आहे.