आटपाडी उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST2021-03-06T04:25:10+5:302021-03-06T04:25:10+5:30
आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करण्यास मंजुरी मिळाली आहे. तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा ...

आटपाडी उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी
आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करण्यास मंजुरी मिळाली आहे. तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी २१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.
आ. बाबर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून उपजिल्हा रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोरोनाच्या कालावधीत गेल्यावर्षी आरोग्यमंत्री टोपे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्याकडे आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याची मागणी केली होती. टोपे यांनी आटपाडी उपजिल्हा रुग्णालय उभा करण्याचे आश्वासन दिले होते.
वर्षभर पाठपुराव्याला गती दिली. कागदपत्रे शासन दरबारी सादर करून विविध पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. नुकतीच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी २१ कोटी निधीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार बाबर यांनी दिली.