सांगलीत राबविला जाणार ‘सनाथ गणेश’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:02+5:302021-08-18T04:32:02+5:30

सांगली : पुण्यातील सनाथ वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने या वर्षीही सांगली, मिरजेत ‘सनाथ गणेश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शाडूच्या मूर्तींची ...

'Sanath Ganesh' project will be implemented in Sangli | सांगलीत राबविला जाणार ‘सनाथ गणेश’ उपक्रम

सांगलीत राबविला जाणार ‘सनाथ गणेश’ उपक्रम

सांगली : पुण्यातील सनाथ वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने या वर्षीही सांगली, मिरजेत ‘सनाथ गणेश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. शाडूच्या मूर्तींची विक्री केंद्रे उभारून अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलन केले जाणार आहे.

फाउंडेशनच्या प्रमुख गायत्री पटवर्धन यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बालगृहातील माजी विद्यार्थी सत्यजीत पाठक याच्या गणपती निर्मिती उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘सनाथ गणेश’ नावाने गणेशमूर्ती विक्री केंद्रे उभारण्यात येणार आहेत. ही केंद्रे कोल्हापूर, सांगली, मिरज व पुणे येथे उभारण्यात येणार असून, या सनाथ गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत. शंभर टक्के शाडूच्या मातीपासून सत्यजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी मूर्ती तयार केल्या आहेत.

सनाथ वेलफेअर फाउंडेशन ही संस्था १८ वर्षांवरील बालगृहातील माजी अनाथ, निराश्रित प्रवेशितांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक प्रकारे साहाय्य करते. त्यापैकी हा एक ‘सनाथ गणेश’चा उपक्रम आहे. संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमातून मिळणारे पैसे बालगृहातील माजी अनाथ, निराश्रित प्रवेशितांच्या पुढील शिक्षणासाठीच वापरले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त भक्तांनी या गणेशमूर्तींचे बुकिंग करावे व संस्थेच्या या उपक्रमास आपला हातभार लावावा, ज्यामुळे सत्यजीत व त्याच्या सहकाऱ्यांच्या या छोट्या उद्योगास थोडीशी मदत होईल, असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.

करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांमध्ये सहभाग या विषयावर अनाथ मुलांसाठी कार्यशाळा राबविणे, लग्न झालेल्या अनाथ मुलींच्या सोबत माहेर म्हणून त्यांच्या सोबत असणे व विवाह कलहामुळे एकल झालेल्या अनाथ मुलींचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे, राज्य शासनाच्या अनाथ मुलांसाठी असलेल्या विविध योजनांचा पाठपुरावा करणे, विविध प्रसार माध्यमातून अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी लोकजागृती घडवून आणणे आदी कामेही ही संस्था करीत आहे.

Web Title: 'Sanath Ganesh' project will be implemented in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.