Sambhaji Bhide Guruji: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या परखड वाणीमुळे ते काही वेळा वादाचा केंद्रबिंदू ठरतात. त्यांच्या काही विधानावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. परंतु सध्या ते एका वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आले आहेत. भिडे गुरुजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संभाजी भिडेंवर सांगलीत एका कुत्र्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांना थोडीशी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुठे, कधी घडला प्रकार?
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसमवेत विविध ठिकाणी फिरतीवर असतात. सोमवारी रात्री भिडे गुरूजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून व इतर चर्चा संपवून ते रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वीच वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली. या मुद्द्यावर संभाजी भिडे गुरुजींना मत मांडले होते. "संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे" असे म्हणत भिडे गुरूजींनी स्मारकाला समर्थन दर्शवले होते.