सांगलीत ब्रँडेड कंपनीच्या नावावर बनावट वस्तूंची विक्री; पोलिसांमुळे विक्रेत्याची बोगसगिरी उघडकीस
By शीतल पाटील | Updated: September 25, 2023 20:53 IST2023-09-25T20:53:34+5:302023-09-25T20:53:53+5:30
वस्तूंच्या किंमती हजारोच्या घरात असताना कवडीमोल दराने मिळत असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.

सांगलीत ब्रँडेड कंपनीच्या नावावर बनावट वस्तूंची विक्री; पोलिसांमुळे विक्रेत्याची बोगसगिरी उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली रस्त्यावर वायरलेस हेडफोन, स्मार्ट वॉचची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पर्दापाश झाला. पोलिसांनी चाळीसगावच्या (जि. जळगाव) चार ते पाच तरूणांना तंबी देत हाकलून लावले. पोलिस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांची फसवणूक टळली.
येथील काळ्या खणीजवळ सकाळी काही तरूण सॅकमध्ये वस्तू घेवून उभे होते. वाहनचालकांना गाडी थांबवून ब्रँडेड कंपनीचे वायरलेस हेडफोनसह स्मार्ट वॉच कमी किंमत देत होते. या वस्तूंच्या किंमती हजारोच्या घरात असताना कवडीमोल दराने मिळत असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. या तरुणांकडून ग्राहकांची फसवणूक सुरू असल्याचे लक्षात येताच काहींनी उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांना माहिती दिली. उपाधीक्षक जाधव यांनी गांभिर्याने दखल घेत पोलिसांचे पथक पाठवले.
संबंधितांकडून त्या वस्तूंची माहिती घेतली. त्यानंतर त्या वस्तू ब्रँडेड कंपनीच्या नसून बनावट असल्याची खात्री झाली. संबंधित तरूणांना याबाबत विचारले असता एकाने त्या वस्तू विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या तरूणांना पोलिसीभाषेत तंबी देत त्यांना हाकलून लावले.