संतांनी मोडली साहित्य निर्मितीची मक्तेदारी
By Admin | Updated: January 1, 2015 00:15 IST2014-12-31T22:47:30+5:302015-01-01T00:15:11+5:30
सदानंद मोरे : आरग येथे पारिवारिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

संतांनी मोडली साहित्य निर्मितीची मक्तेदारी
मालगाव : साहित्य लेखनाची व निर्मितीची विशिष्ट वर्गाकडे असणारी मक्तेदारी मोडून काढण्याचे क्रांतिकारक कार्य संतांनी केले. त्यामुळेच बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
आरग (रा. मिरज) येथे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था व आरग ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित पारिवारिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. मोरे म्हणाले की, जाती व्यवस्थेमुळे साहित्य निर्मितीत अधिकार भेद होता. हा अधिकार एका विशिष्ट वर्गाकडेच होता. संतांनी तेराव्या शतकात या एकाधिकारशाहीला आव्हान देत साहित्यनिर्मितीची मक्तेदारी मोडून काढली. या क्रांतिकारक निर्णयामुळेच संत चोखोबा यांच्या रूपाने बहुजन समाजाला साहित्य निर्मितीचा अधिकार मिळाला. काव्यस्फूर्ती ज्या त्या वेळी शब्दरूपात आणली पाहिजे, अन्यथा ती पडद्याआड जाते. संतांच्या नंतर पंडित व शाहिरांनी काव्यरचनेचा प्रयोग केला, परंतु तो संत साहित्यासरखा टिकून राहिला नाही. साहित्य आणि वाचक यांचा सहभाग असल्यानेच संत साहित्य टिकून राहिले. मराठी भाषेचा वारसा संतांकडून आला. त्यांनीच मराठी भाषा घडविली. संत साहित्यावर टीका करणाऱ्या अनेकांना साहित्य निर्मितीसाठी संतांच्या विचाराचा आधार घ्यावा लागला हे वास्तव आहे. महात्मा फुले यांनीही संत साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली. संतांचे विचार आजही समाजापर्यंत पोहचलेले नाहीत. ते संमेलनाच्या माध्यमातून पोहोचविण्याची गरज आहे. आधुनिक साहित्याशी संत साहित्याचा संबंध काय आहे, हे घुमान येथील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांगण्याचा आपला प्रयत्न असेल, असे डॉ. मोरे यांनी शेवटी सांगितले.
तुकाराम गायकवाड यांनी स्वागत, तर डॉ. संतोष वाले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, सरपंच एस. आर. पाटील, जि. प. सदस्य प्रकाश देसाई, चंद्रकांत बाबर, बी. आर. पाटील उपस्थित होते. प्रा. पूजा अकोडकर, विजय जंगम, शांताराम कांबळे या साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आले. (वार्ताहर)
आरग येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली असतानाच डॉ. मोरे यांची घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.