साहेबराव जगताप यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:59+5:302021-07-05T04:16:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संतोषवाडी (ता. मिरज) येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राजेराव जगताप (वय ६५) यांचे ...

साहेबराव जगताप यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संतोषवाडी (ता. मिरज) येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राजेराव जगताप (वय ६५) यांचे अल्प आजाराने शनिवारी मध्यरात्री निधन झाले. जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे माजी सभापती खंडेराव जगताप यांचे ते लहान भाऊ होत. साहेबराव यांच्या निधनाने मिरज पूर्व भागातील राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे.
आबा या नावाने ते परिचित होते. संतोषवाडी विकास सोसायटीचे संचालकपद वगळता कोणत्याही संस्थेत त्यांनी पद स्वीकारले नाही किंवा निवडणूक लढवली नाही, मात्र पंचक्रोेशीतील त्यांचे राजकीय वर्चस्व वादातीत होते. अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये मदन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले. गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपमध्ये खासदार संजय पाटील यांचे समर्थक म्हणून ते काम करत होते. जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत त्यांच्या ताकदीवर मिरज पूर्व भागात भाजपला चांगले यश मिळाले होते. मिरज पंचायत समिती, दुय्यम आवार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बॅक अशा अनेक संस्थांशी ते निगडीत होते.
पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. संतोषवाडीमध्ये शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सलगरेचे सरपंच तानाजी पाटील व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अंत्यविधी केला. त्यांच्या पश्चात भाऊ खंडेराव व शहाजीराव यांच्यासह पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीसह विविध संस्थांमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.