इस्लामपुरात विरोधकांच्या गाडीला सदाभाऊंचे इंधन
By Admin | Updated: July 7, 2016 00:27 IST2016-07-07T00:02:41+5:302016-07-07T00:27:55+5:30
नगरपालिका निवडणूक : सुसाट धावणाऱ्या जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा जोरदार प्रयत्न

इस्लामपुरात विरोधकांच्या गाडीला सदाभाऊंचे इंधन
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
इस्लामपूर नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीची ‘जयंत एक्स्प्रेस’ सुसाट धावत आहे. आर्थिक इंधन नसलेल्या विरोधकांच्या गाडीत मात्र अंतर्गत मतभेद आणि अहंपणा असल्याने त्यांच्या गाडीचा वेग मंदावला आहे. विरोधकांच्या पाठीशी राज्यातील सत्ताकेंदे्र आहेत. त्यातच शहरात वास्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. ते मंत्री झाल्यास विरोधकांच्या मंदावलेल्या गाडीचा वेग वाढणार आहे. यातूनच जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा प्रयत्न होणार आहे.
इस्लामपूर शहराचा विकास हा ज्वलंत प्रश्न आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तारांकित कल्पनेतून पुढे आलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. पालिकेच्या सभागृहात विरोधकांची तीन डोकी आहेत. परंतु त्यांनी वेगवेगळ्या टोप्या घातल्या आहेत.
त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी शहराचा नियोजित विकास आराखडा स्वत:च्या मालमत्ता वाचवून आणि बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करुन स्वबळावर मंजूर केला आहे. विरोधकांची राज्यात सत्ता असतानाही त्यांना इस्लामपुरातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभागृहाला धक्का लावता आला नाही. त्यामुळे विरोधकांची ताकद असून नसल्यासारखीच आहे.
विस्कटलेल्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर असलेले आमदार सदाभाऊ खोत सरसावले आहेत. या दोघांना शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांची साथ राहणार आहे. त्यांनाही कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.
मागील निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत यांच्यासह सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांची ताकद होती. परंतु राज्यात सत्ता नसल्याने ही ताकद अत्यंत तोकडी पडली. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे मंत्रीपद नाही. तरीही विविध संस्थांवर असलेल्या प्राबल्यामुळे ‘जयंत एक्स्प्रेस’ या भागात सुसाट आहे.
येणाऱ्या काळात आमदार सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले तरी, ते जयंत एक्स्प्रेसला रोखण्यात कितपत यशस्वी होतात, हे दिसून येणार आहे. याकडे सर्वांचे लक्षही लागले आहे.
मंत्रीपदानंतरच मैदानात उतरण्याची तयारी!
येणाऱ्या दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. वाळवा—शिराळ्यातील सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मंत्री झाल्यानंतरच ते पालिकेच्या रणांगणात उतरणार असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे.