घरबसल्या एस. टी.चे कळेल अचूक ‘लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:04+5:302021-07-07T04:32:04+5:30

सांगली : एस. टी. बस नेमकी कुठे आहे, हे आता प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही कळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने ...

S. sitting at home. T will know the exact 'location' | घरबसल्या एस. टी.चे कळेल अचूक ‘लोकेशन’

घरबसल्या एस. टी.चे कळेल अचूक ‘लोकेशन’

सांगली : एस. टी. बस नेमकी कुठे आहे, हे आता प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही कळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने सर्व बसगाड्यांना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) बसवली आहे. या तंत्राचा अधिकारी वापर करत आहेत. प्रवाशांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून हे ॲप वापरण्यासाठी खुले केले जाणार आहे. शिवशाही या आरामदायक बसेस उपलब्ध करून दिल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञानानेही हायटेक होत असल्याने महामंडळाचे पाऊल पुढे पडते आहे.

व्हीटीएस यंत्रणा बसविण्याकरिता महामंडळाकडून जिल्ह्यासह संपूर्ण बसथांब्यांचे मॅपिंग झालेले असून, सांगली विभागात एकूण ७६२ बसगाड्या आहेत. त्यापैकी ४३ मालट्रक सोडल्यास उर्वरित ७१७ बसगाड्यांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. एस. टी. महामंडळाकडून पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत असलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम (व्हीटीएस) सुरु केली आहे. मात्र, गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या एस. टी. थांब्याचे मॅपिंग करण्याचे आव्हान महामंडळ प्रशासनासमोर होते. सांगली विभागात बसगाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. महामंडळातर्फे राज्यातील ३० हजारांहून अधिक बसथांब्यांचे मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. सांगली विभागातील ७१७ बसगाड्यांना ही व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवली आहे.

दि. १५ ऑगस्टपासून प्रवाशांना एस. टी.च्या प्रत्येक गाडीचे ठिकाण घरबसल्या आणि कुठेही कळू शकणार आहे. महामंडळाच्या या व्यवस्थेमुळे आता शहरीच नव्हे तर ग्रामीण प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

चौकट

दहा आगारांत इलेक्ट्रॉनिक फलक

प्रवाशांना बसचा ठावठिकाणा कळावा, यासाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. त्या जोडीलाच आगारांमध्ये इलेक्ट्रॉनिक फलकांचा वापर केला आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमधील बसस्थानकांवर इलेक्ट्रॉनिक फलक बसवले आहेत. या फलकांवर प्रत्येक दहा मिनिटाला जिल्ह्यातील ७१७ बसेस कुठेपर्यंत आल्या आहेत, याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

कोट

एस. टी. बस नेमकी कुठे आहे आणि किती गतीने धावत आहे, याची माहिती सध्या अधिकाऱ्यांना कळत आहे. तशी सोय एस. टी. महामंडळाच्या संगणकामध्ये बसवली आहे. परंतु, प्रवाशांना ती माहिती मिळत नाही. प्रवाशांनाही घर बसल्या बसचे लोकेशन कळण्यासाठी नवीन ॲप विकसित केले आहे. हे ॲप १५ ऑगस्टपासून प्रवाशांना वापरण्यासाठी मिळणार आहे.

- अरुण वाघाटे, प्रभारी विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ, सांगली विभाग.

चौकट

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

बसगाडीला विलंब झाल्यास प्रवाशांना तासनतास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. आगामी काळात बसगाड्यांना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) बसविण्यात आल्यानंतर प्रवाशांना बसचे निश्चित ठिकाण कळणार असून, यामुळे त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे. तसेच चालक मुद्दाम कुठे बस थांबवत आहे का? थांब्याचा गैरवापर करत आहे का? या सर्व गोष्टींनाही चाप बसणार आहे, असेही अरुण वाघाटे यांनी सांगितले.

चौकट

ॲपवर कोणती माहिती मिळेल?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीकरिता ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम एमएसआरटीसी कॉम्प्युटर’ हे नवीन ॲप तयार केले आहे. रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एस. टी. महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्‍य होणार आहे. प्रवाशांना जवळची बसस्थानके, त्याठिकाणी येणाऱ्या - जाणाऱ्या बस, बस कुठे जात आहे, सध्या ती कुठे आहे, बस किती वेगाने धावत आहे, बस किती वेळापासून थांबून आहे, बसचा पुढील थांबा कोणता आहे, बस क्रमांक काय आहे, बसचा मार्ग कोणता आहे हेदेखील प्रवाशांना आता पाहता येणार आहे.

Web Title: S. sitting at home. T will know the exact 'location'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.