जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहारात त्रुटींची गर्दी
By Admin | Updated: December 26, 2014 00:13 IST2014-12-25T22:50:55+5:302014-12-26T00:13:48+5:30
ठेकेदार नामानिराळा : मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेची गरज

जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहारात त्रुटींची गर्दी
सांगली : उद्देश चांगला असूनही अनेक त्रुटींची गर्दी झाल्याने शालेय पोषण आहाराला वादाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात निकृष्ट धान्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्यानंतरही या त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. छोट्या गावांमधील मोजक्याच शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर संकल्पनेसह अनेक चांगल्या गोष्टी योजनेत समाविष्ट करून खऱ्याअर्थाने ही योजना आदर्शवत करता येऊ शकते. मात्र त्याबाबत शासकीय पातळीवर प्रचंड उदासीनता दिसून येत आहे.
शालेय पोषण आहारातील पुरवठा करणारी यंत्रणाच सदोष असल्याने त्याचे परिणाम पुढील यंत्रणेला भोगावे लागतात. शासकीय पातळीवरही केवळ शासकीय आदेशाचेच पालन करण्याबाबत धन्यता मानण्यात येते. योजनेतील त्रुटी दूर करून पोषण आहाराचा एक चांगला पॅटर्न राज्यभर आणि देशभर देण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कधीच धडपड दिसत नाही. चाकोरीबध्द कामात ते व्यस्त असल्यामुळे वारंवार विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ होत आहे. पंचनामे करायचे, आदेश द्यायचे आणि पडदा टाकायचा, या गोष्टींपुरतीच कारवाईची चक्रे फिरतात. पुढे पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ चालू होते. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकच बळी
पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापकांची मुक्तता करण्यात आल्याचा गवगवा झाला. प्रत्यक्षात आजही चव, वजन, उंची या रजिस्टरांबरोबरच देयकाची कागदपत्रे यात चूक झाल्यास मुख्याध्यापकांनाच बळीचा बकरा बनविले जाते.
मध्यवर्ती स्वयंपाकगृह संकल्पनेची गरज
छोट्या गावांमध्ये एकच मध्यवर्ती स्वयंपाकगृह करून त्या ठिकाणाहून काही मिनिटातच सर्व शाळांमध्ये शिजविलेले गरम अन्न पोहोचविले जाऊ शकते. यामुळे एकाचवेळी सर्वत्र खर्च होणारे मनुष्यबळ, पैशाचा अपव्यय या गोष्टी थांबविता येऊ शकतात. शासनाचाच यात आर्थिक फायदाही होऊ शकेल. शिवाय कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आहार पुरविण्यासाठी ठेकेदारांच्या अल्प प्रतिसादाचा प्रश्नही निकालात निघेल.
योजनेतील अडचणी दूर करुन शिस्तबद्धतेची आवश्यकता
गोदामातून धान्य उचलतानाच दर्जा तपासणी यंत्रणा नाही
निकृष्ट मालाबाबत पंचनामा पथक नाही
भाजी शिजविण्याचे अनुदान वेळेत नाही
वजन मापनात अजूनही इलेक्ट्रॉनिक काट्याची सोय नाही
मसाल्याच्या पदार्थांचे प्रमाण अत्यल्प
पारदर्शीपणाचा अभाव
प्रशासनाचेही योजनेकडे दुर्लक्ष होत आहे
माल खराब का होतो?
बऱ्याचदा शाळेमध्ये माल उतरविताना तो चांगला असतो. त्यामुळे तो स्वीकारला जातो. प्रत्यक्षात १५ दिवसातच तो खराब होतो. यामागचे कारण तपासून त्याबाबत सुधारणा करण्यासाठी आजवर कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
नव्वद टक्के शाळांमध्ये गोदाम व स्वतंत्र स्वयंपाक गृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे साठवणूक आणि स्वयंपाकगृह याबाबतची तजवीज करण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.