सांगली शहरात पाण्यासाठी धावाधाव
By Admin | Updated: July 27, 2014 00:31 IST2014-07-27T00:24:30+5:302014-07-27T00:31:56+5:30
गलथान कारभार : ऐन पावसाळ््यात सांगली, कुपवाडमध्ये पाणीटंचाई

सांगली शहरात पाण्यासाठी धावाधाव
सांगली : गेल्या तीन दिवसांपासून सांगली व कुपवाडमधील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. यंत्रणा पूर्ववत केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात असला, तरी शनिवारीही पाण्याअभावी नागरिकांचे हाल झाले. ऐन पावसाळ््यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.
सांगली व कुपवाड या दोन शहरांना गुरुवारी मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या सत्ताधारी नगरसेवकांनी माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने शुद्ध आणि शंभर टक्के फिल्टर झालेले पाणी देण्यासाठी गाळप होऊ शकेल इतकाच पुरवठा करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठ्यावर झाला. शहरात दैनंदिन पुरवठ्यापेक्षा कित्येक पटीने कमी पाण्याचा पुरवठा झाला. माळबंगला येथून पुरवठा होणाऱ्या कुपवाड, अभयनगर, यशवंतनगर, विश्रामबागसह उपनगरांत शुक्रवारी तासभरच पाण्याचा पुरवठा झाला. हा पुरवठाही शुद्ध नव्हता. शनिवारीही सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी नव्हते. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दुसऱ्या बाजूला पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनीही शनिवारी दुपारी बंद होते. त्यामुळे तक्रार करण्यासही नागरिकांना अडचणी आल्या. (प्रतिनिधी)