उद्धट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:07+5:302020-12-05T05:09:07+5:30

जत : जत पंचायत समितीच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सदस्यांनी पाठविलेल्या पत्रांना दाद देत नाहीत, ती स्वीकारली जात ...

Rude officers will take action against employees | उद्धट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

उद्धट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

जत : जत पंचायत समितीच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सदस्यांनी पाठविलेल्या पत्रांना दाद देत नाहीत, ती स्वीकारली जात नाहीत. जिल्हा परिषद कार्यालयात पाठवावीत, अशी सूचना केली जात आहे. असे उद्धट वर्तन करून सदस्यांच्या पत्राची अवहेलना करून विकास कामांत आडकाठी आणणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा ठराव जत पंचायत समिती मासिक बैठकीत करण्यात आला. सभापती मनोज जगताप अध्यक्षस्थानी होते.

जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पत्र पाठवल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी पत्र स्वीकारले नाही, अशी तक्रार पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत यांनी सभागृहात केल्यानंतर सभापतींनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला सभागृहात बोलावून घेऊन त्यांची कानउघाडणी केली. यापुढे असा प्रकार घडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पंचायत समितीचे विश्रामगृह खासगी ठेकेदाराला चालवण्यासाठी दिले आहे. त्याची दुरुस्ती व देखभाल त्यांनाच करावी लागणार आहे, त्यामुळे आपल्याला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, अशी माहिती बांधकाम विभागाच्यावतीने सभागृहात देण्यात आली.

तालुक्यातील १ लाख ३० जनावरांना लाळखुरकत लसीचा डोस देण्यात आला आहे. उर्वरित ९० हजार जनावरांनाही यापुढील कालावधित डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सभागृहात देण्यात आली. अनुसूचित जाती व इतर प्रवर्गासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५ हजार ७३८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी १८५ असून, इतर प्रवर्गासाठी ५ हजार ५५३ इतके आहे. पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत, अशी माहिती गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी सभागृहात दिली. यावेळी पाणीपुरवठा, वीज वितरण, दळणवळण, बांधकाम, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आदी विषयांवर सभागृहात चर्चा झाली. या चर्चेत दिग्विजय चव्हाण, रवींद्र सावंत, रामान्ना जीवन्नवार, श्रीदेवी जावीर यांनी भाग घेतला. मंगल जमदाडे, सुशीला तावशी, अर्चना पाटील, लक्ष्मी माळी, दऱ्याप्पा हातळ्ळी, कविता खोत, अश्विनी चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Web Title: Rude officers will take action against employees