सांगलीत आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन, कामकाज ठप्प
By शीतल पाटील | Updated: May 8, 2023 17:42 IST2023-05-08T17:41:21+5:302023-05-08T17:42:14+5:30
बढत्या, पदोन्नती रखडल्या

सांगलीत आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन, कामकाज ठप्प
सांगली : उपप्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) बढतीसाठी आकृतीबंध कार्यान्वित होऊनही अंमलबजावणी न झाल्याने बढत्या, पदोन्नती रखडल्या आहेत. या विरोधात आरटीओ कर्मचाऱ्यांत असंतोष असून कर्मचारी संघटनेने सोमवारी लेखणी बंद आंदोलन केले. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प होते.
संघटनेच्यावतीने परिवहन आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आकृतीबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनाला सादर केला होता. आकृतीबंध मंजूरीसाठी संघटनेने लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ जानेवारी २०२३ रोजी काढण्यात झाला. त्यानुसार आकृतीबंध तयार केला. मात्र त्याची अंमलबजावणी रखडली. परिणामी अनेक कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. वर्ग-२ ची पदे कित्येक वर्षापासून रिक्त आहेत.
प्रशासनाने मोटार वाहन विभागाती कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी आज सांगलीतील आरटीओ कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात आरटीओ कर्मचारी संघटना अध्यक्ष संतोष मदने, अमर महेकर, वीरेंद्र नागावकर, प्रताप जामदार, दिनकर पाटील, नंदकुमार पाटील, नितीन कोकने, लता कांबळे, अनिता सुतार, दीपा कापसे यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.