तासगावच्या सूतगिरणीस ३८ लाखांची कर्ज सवलत
By Admin | Updated: August 30, 2015 22:35 IST2015-08-30T22:35:44+5:302015-08-30T22:35:44+5:30
संचालक मंडळाचा निर्णय : अनेक संस्थांना लाभ--जिल्हा बँक गैरव्यवहार-१

तासगावच्या सूतगिरणीस ३८ लाखांची कर्ज सवलत
सांगली : संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीवरून सध्या चर्चेत असलेल्या तासगावच्या स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिली होती. १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात या कर्ज सवलतीला १३ संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. ‘रामानंद भारती’प्रमाणेच अनेक संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव तत्कालीन संचालक मंडळाने केला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे स्वामी रामानंद भारती या सूतगिरणीची उभारणी केली. त्यांच्या निधनानंतर ही संस्था या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. बिनविरोध निवडीचे प्रकरण सध्या न्यायालयात गेले असतानाच, जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणात या सूतगिरणीला दिलेल्या सवलतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी, स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीस ज्या संस्थांवर कर्ज सवलतीचा वर्षाव करण्यात आला, त्या बहुतांश प्रकरणांचा समावेश आरोपपत्रात करुन त्यांनी तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरले आहे.
या संस्थेस २७ एप्रिल २00७ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन ३८ लाख ९ हजार रुपयांची कर्ज सवलत दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. याप्रकरणी निर्णयप्रक्रियेत असलेल्या तत्कालीन १३ संचालकांना जबाबदार धरले आहे. यामध्ये आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, बँकेचे विद्यमान संचालक प्रा. सिकंदर जमादार, मोहनराव कदम, दिनकरराव हिंदुराव पाटील, लालासाहेब यादव, जगन्नाथ म्हस्के, विजय सगरे आदी नेत्यांचा समावेश आहे. दोन आमदार आणि दोन विद्यमान संचालक या प्रकरणात अडकले आहेत. (प्रतिनिधी)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी नुकतेच १00 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. ९६ पानी आरोपपत्र आणि १८ पानी नोटीस तयार केली आहे. आरोपपत्रात त्यांनी नुकसानीसाठी सात विद्यमान संचालक, ३६ माजी संचालक, ५0 वारसदार आणि ७ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. आरोपपत्रातील विविध प्रकरणांवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून....