नियमांना डांबर फासून रस्ते निर्मिती
By Admin | Updated: October 29, 2014 00:08 IST2014-10-28T23:11:02+5:302014-10-29T00:08:39+5:30
महापालिकेचा कारभार : शहरातील नागरिकांमधून संताप

नियमांना डांबर फासून रस्ते निर्मिती
अविनाश कोळी - सांगली -नियम, तरतुदी, कार्यप्रणालीची मार्गदर्शक तत्त्वे यांनाच डांबर फासून महापालिकेने आजवर रस्ते निर्मिती केल्याचे दिसून येते. त्यामुळेच नागरिकांना चांगल्या रस्त्यांचे सुख आजवर मिळू शकले नाही. अल्पायुषी रस्ते करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होत असल्याने आता लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहरातील एकही रस्ता सध्या सुस्थितीत नाही. दर्जा काय असतो, याची कल्पना देण्यासाठीही उदाहरणादाखल रस्ता कुठेही दिसत नाही. रस्ते अल्पायुषीच असतात, हे ठासविण्याचा प्रयत्न जणू महापालिका व ठेकेदार करीत असावेत. महापालिकेच्या स्थापनेला १६ वर्षे झाली, तरीही रस्ते निर्मितीच्या प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. उलट महापालिका जशी अनुभवी होत आहे, तसतसे रस्त्यांचे आयुष्य कमी होत आहे. रस्त्यांच्या कामाचे गणित याठिकाणी वेगळे आहे. म्हणूनच आजवर रस्ते खराब का होतात, याचे उत्तर महापालिकेला अद्याप देता आलेले नाही.
तरतुदींचे पालन
कोण करणार?
५
महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २१0 (३) नुसार महापालिकांना आराखड्यासह रोड रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. रस्त्यांबाबतच्या घडामोडींची नोंद यामध्ये ठेवायची असून, ते सर्वांसाठी खुले ठेवण्याचीही तरतूद आहे. प्रत्यक्षात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे असे रोड रजिस्टरच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
महापालिकेच्या अधिनियमातील कलम ६३ (१८) नुसार सार्वजनिक रस्ते, पूल बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणेची जबाबदारी महापालिकेची आहे. २५ सक्तीच्या सेवांमध्ये रस्ते निर्मितीचाही समावेश आहे.
शहर सुधार समितीच्यावतीने शहरातील खड्डेप्रश्नी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेला म्हणणे मांडण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर महापालिका क्षेत्रातील एकाही रस्त्यावर एकही खड्डा नाही, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांनी दाखल केले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
आयआरसी काय सांगते
इंडियन रोड काँग्रेसने दिलेले रस्ते निर्मितीचे दर्जात्मक प्रमाण राष्ट्रीय स्तरावर वापरले जाते. त्यांच्या प्रमाणानुसार पॅचवर्कचे काम करताना खड्डा कोणत्याही आकारात असला तरी, चौकोनात तो खणून त्यामध्ये डांबरीकरणासारखे स्तर करून पॅचवर्क करावे, असे म्हटले आहे. महापालिका क्षेत्रात खड्ड्यांमध्ये मुरुम टाकून पॅचवर्क केले जाते. त्यामुळे काही दिवसातच त्या मुरुमाची माती होऊन शहरातील धुलिकणांच्या प्रमाणात भर पडते. गतिरोधकांनासुद्धा नियमावली आहे. अशा कोणत्याही नियमांचा, प्रमाणांचा आधार महापालिका घेत नाही. त्यामुळेच रस्ते अल्पायुषी होत आहेत.